पिंपरी : पिंपरी येथील एका बँकेत बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी १२ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बँकेच्या उपव्यस्थापकाने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने ८० हजार १०० रुपये रोख रक्कम बँकेत जमा करण्यासाठी आणले होते. बँकेतील कॅशिअरने ग्लोरीकॅश सॉर्टिंग मशीनमध्ये या नोटा तपासल्या असता, २०० रुपयांच्या नऊ नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले. संत तुकारामनगर पोलीस तपास करत आहेत.
सूसमध्ये नोकरीच्या आमिषाने पाच लाखांची फसवणूक
चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून दोन आरोपींनी एका तरुणाची पाच लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना सुसगाव येथे घडली. या प्रकरणात २६ वर्षीय तरुणाने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःला एका कंपनीचे मनुष्यबळ विभागाचे (एचआर) असल्याचे भासवले. चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादीकडून चार लाख ६५ हजार रुपये आणि त्यांच्या मित्राकडून ८० हजार रुपये असे एकूण पाच लाख ४० हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना बनावट ऑफर लेटर पाठवून नोकरी न देता फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करत आहेत.
म्हाळुंगेत ट्रकच्या धडकेत तरुणीचा मृत्यू
म्हाळुंगे गावच्या हद्दीत एका भरधाव ट्रकने पायी चालणाऱ्या तरुणीला धडक दिली. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (१२ ऑगस्ट), म्हाळुंगे ते निघोजे रोडवर घडली. रिया सहानी (१८) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणात राहुल जयप्रकाश सहानी यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गजानन मारुती पानचावरे (३२, उरुळी देवाची जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पानचावरे ट्रक भरधाव वेगात चालवत होता. वळणावर त्याचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पायी चालत असलेल्या रियाच्या अंगावर उलटला. यामध्ये रिया गंभीर जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
चाकणमध्ये जमिनीच्या वादातून एकास मारहाण
एका व्यक्तीला चार जणांनी मिळून जमिनीच्या वादातून मारहाण केल्याची घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साबळेवाडी येथे घडली.या प्रकरणी ३९ वर्षीय व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपींना जमीन उकरण्याचा जाब विचारला. त्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. फिर्यादीच्या भावाने शिवीगाळ करू नका, असे म्हटले असता आरोपीने लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या उजव्या पायावर मारहाण केली. फिर्यादी त्याला अडवायला गेले असता, आरोपीने त्यांच्या डोक्यात दगड मारला, ज्यामुळे त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले. फिर्यादीच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांच्या कानशिलात मारली. चाकण पोलीस तपास करत आहेत.
वाकडमध्ये मित्रांकडून तरुणाला मारहाण
वाकड येथील छत्रपती चौकात एका तरुणाला त्याच्या मित्रांनीच मारहाण केल्याची घटना मंगळवारी (१२ ऑगस्ट) रात्री घडली. याबाबत २१ वर्षांच्या तरुणाने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जेवण करून त्यांच्या खोलीजवळ परत आले असताना दोन आरोपी दुचाकी घेऊन उभे होते. आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करून त्यांच्या अंगावरील शर्ट पकडून कानशिलात मारले. यात त्यांच्या चष्म्याची काच फुटून डोळ्याच्या बाजूला दुखापत झाली. आरोपीने हातातील स्टीलच्या कड्याने त्यांच्या डोक्यावर मारून गंभीर दुखापत केली आणि ठार मारण्याची धमकी दिली. वाकड पोलीस तपास करत आहेत.
भूगावमध्ये कंपनीच्या पैशांची अफरातफर
भूगाव येथील एका कंपनीतील कर्मचाऱ्याने कंपनीचा विश्वास संपादन करून पैशांची अफरातफर केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात ३३ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या फिर्यादीनुसार एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या कंपनीत काम करत होता. त्याने फिर्यादीचा विश्वास संपादन करून एका कंपनीला आठ लाख १२ हजार ३९३ रुपयांचे एसी ब्लॉक आणि ब्लॉक जॉइंटिंग मोटर असे बांधकाम साहित्य दिले. मात्र, त्याने ती रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता स्वतःकडे ठेवून अफरातफर केली. कंपनीची आर्थिक फसवणूक केली. बावधन पोलीस तपास करत आहेत.