पिंपरी : एका किरकोळ अपघातानंतर दुचाकी नीट चालविण्यास सांगितल्याच्या कारणावरून झालेल्या वादात तीन तरुणांनी एका २१ वर्षीय युवकाला दगडाने मारहाण केली. ही घटना चऱ्होली परिसरात घडली.
तरुणाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दुचाकीवरून वरून जात असताना तो घसरला. त्यावर फिर्यादीने दुचाकी व्यवस्थित चालवा, असे सांगितल्याने एकत्र येऊन हाताने व दगडाने मारहाण केली तसेच शिवीगाळ करत दमदाटी केली. दिघी पोलीस तपास करत आहेत.
टोळक्याकडून किराणा दुकानदाराला कोयत्याने मारहाण
किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळक्याकडून दुकान मालकावर कोयत्याने व प्लास्टिक पाइपने हल्ला केला. ही घटना चऱ्होलीत घडली. आयुष उमेश रॉय (१९, आळंदी ता. खेड), अभय सुखदेव पाखरे (२१, केळगाव, ता. खेड), रवि सुभाष गलबे (२३, आळंदी ता. खेड), सौरभ विनोद दाभाडे (१८, आळंदी ता. खेड) आणि प्रसाद विठ्ठलराव रारके (२१, आळंदी ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. भिमा राम चौधरी (२५, चऱ्होली खुर्द, ता. खेड) यांनी याबाबत आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुुसार, आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून हाताने व प्लास्टिक पाइपने मारहाण केली. त्याचवेळी आरोपी आयुष रॉय याने कोयता घेऊन फिर्यादीस धमकावले. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
भोसरीत तीन जणांकडून विद्यार्थ्याला गजाने मारहाण
एका १८ वर्षीय विद्यार्थ्याला ओळखीच्या तिघांनी लोखंडी गज व दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना भोसरीतील हुतात्मा चौकाजवळील परिसरात घडली. याबाबत १८ वर्षीय विद्यार्थ्यांने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तू माझ्या बायकोला काय बोलला आणि तू माझ्या वहिनीला मेसेज का केला? या कारणावरून फिर्यादीस लाथाबुक्यांनी, लोखंडी गज व दगडाने मारहाण केली. या घटनेत फिर्यादीच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला मार लागला असून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.
दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
एका भरधाव वेगातील दुचाकीने धडक दिल्यामुळे पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना पिंपरी येथे घडली.
हबीब अन्नुउल्लाह सय्यद (४४, मिलींदनगर, पिंपरी) असे मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक चिरंजीव नागेश दलालवाड यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञात दुचाकीस्वाराने भरधाव वेगाने, निष्काळजीपणे वाहन चालवत पाठीमागून हबीब सय्यद यांना जोरात धडक दिली. या अपघातात सय्यद यांचा मृत्यू झाला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
गावठी दारूसाठीचे कच्चे रसायन जप्त; महिलेवर गुन्हा
बेकायदेशीरपणे गावठी दारू तयार करण्यासाठी साठवलेले दोन हजार लिटर कच्चे रसायन पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई आंबी गाव परिसरात करण्यात आली. पोलीस शिपाई राणी राउत यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी महिलेच्या ताब्यातून एक लाख दोन हजार रुपयांचे दोन हजार लिटर रसायन जप्त करण्यात आला आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.
पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला
जुन्या वादातून एका तरुणाला तीन जणांनी दगडांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना चिखलीतील स्मशानभूमीजवळ घडली. पोलिसांनी रोहन उर्फ गब्या भानुदास यादव याला अटक केली आहे. त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अशोक राजेंद्र भोसले (३२, म्हाळुंगे, ता. खेड) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्याचा मित्र हे दत्तमंदिराजवळ सिगारेट पित होते. त्यावेळी आरोपी यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून तेथे आले. आरोपींनी फिर्यादीच्या डोक्यात, छातीवर व पाठीवर दगडांनी हल्ला करून गंभीर जखमी केले. चिखली पोलीस तपास करत आहेत.
खंडणी प्रकरणी दोघांवर गुन्हा
वडमुखवाडी येथील बांधकाम प्रकल्पाच्या व्यावसायिकाकडे दोन जणांनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. ही घटना १३ सप्टेंबर २०२४ ते ३ एप्रिल २०२५ या कालावधीत घडली. याबाबत ४५ वर्षीय व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या बांधकाम प्रकल्पावरील कामगारांना दमदाटी करून काम बंद पाडले. प्रकल्प सुरु ठेवण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. फिर्यादीने पैसे न दिल्याने आरोपींनी सोसायटीसमोर बदनामीकारक फलक लावून समाज माध्यमातील ग्रुपवर ७० लाख रुपये भेटतील असा संदेश टाकून फिर्यादीविरोधात अफवा पसरवली. दिघी पोलीस तपास करत आहेत.
महिलेची सोन्याची चेन घेऊन फसवणूक
एका महिलचा विश्वास संपादन करून तिची सोन्याची चेन घेत फसवणूक केली. ही घटना चिंचवड येथे घडली. रावेत येथील एका ३५ वर्षीय महिलेने याबाबत निगडी पोलीस ठायात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून तिच्याकडून ९५ हजार रुपये किंमतीची १४ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन घेतली व ती परत न करता ठिकाणावरून पसार झाला. निगडी पोलीस तपास करत आहेत.
