पिंपरी : इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने कुदळवाडीत प्रतिदिन तीन दशलक्ष लिटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी) कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे. नदीमध्ये मिसळणारे रासायनिक व दूषित पाणी रोखण्यास मदत होत आहे. ‘नॅशनल रिव्हर कॉन्झर्वेशन डायरेक्टरेट’ने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये इंद्रायणी नदीच्या प्रदूषण पातळीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे. चिखली, कुदळवाडी, जाधववाडी परिसरातील औद्योगिक कारखाने, गोदामे आणि अनधिकृत व्यवसायांमधून रासायनिक पाणी, तेल व ग्रीसचे होणारे विसर्जन यातून नदी प्रदूषित होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर कुदळवाडी, जाधववाडी येथील नाल्यालगतचे अतिक्रमण सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी मोकळे करण्यात आले.

हेही वाचा : पिंपरी : रक्षक सोसायटी चौकातील वाहतूक कोंडी सुटणार, महापालिकेने घेतला ‘हा’ निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या निर्देशांनुसार महापालिकेने उपाययोजना सुरु केल्या. कुदळवाडीत प्रतिदिन तीन दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारला. या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम व्यावसायिक, नागरिकांना मोफत उपलब्ध करुन देण्यासाठी पालिका प्रोत्साहन देत आहे. प्रक्रिया केलेले पाणी पाच मिनिटांत टँकरमध्ये भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पिण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी पाण्याचा वापर केल्याने नदीवरील अवलंबित्व कमी होणार आहे. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले की, नदी प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची यशस्वी अंमलबजावणी एक महत्त्वाचा टप्पा आहे. नदी रक्षणाला प्राधान्य आहे. पवना नदीवरील एका नाल्यावरही ‘ईटीपी’ उभारण्यात येणार आहे. नदीसुधार प्रकल्पाअंतर्गत त्याचे काम केले जाणार आहे.