पिंपरी : सत्ताधाऱ्यांना बळीराजाबद्दल प्रेम नाही. कांदा प्रश्न असेल, साखर निर्यात बंदी असेल, या ना त्या निमित्ताने बळीराजा संकटात कसा जाईल, हे पाहणारे आजचे राज्यकर्ते असल्याचा आरोप करत या नाकर्त्या सरकारविरोधात एकजुटीची शक्ती उभी करून महाराष्ट्राचे चित्र बदलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मी सेवेकरी सोशल फाउंडेशन’च्यावतीने शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केळगाव येथे ‘साहेब केसरी’ बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. या बैलगाडा शर्यतीच्या अंतीम लढती पाहण्यासाठी रविवारी पवार यांनी हजेरी लावली. खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, फाऊंडेशनचे अध्यक्ष सुधीर मुंगसे, सोमनाथ मुंगसे यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा : तळवडे घटनेत आत्तापर्यंत १४ जणांचा मृत्यू; आरोपी शरद सुतारला पोलिसांनी घेतलं ताब्यात

आतापर्यंत आपण वाहिनीवरच बैलगाडा स्पर्धा पाहत होतो. मात्र, प्रत्यक्ष ही स्पर्धा पाहिल्याशिवाय डोळ्याचे पारणे फिटत नाही, याचे प्रत्यंतर आले. बैलगाडा स्पर्धा वेगवान स्पर्धा आहे. गुरा-ढोरांप्रती जिव्हाळा असलेल्या बळीराजाच्या निष्ठेची ही स्पर्धा आहे. देशपातळीवर काही धोरणात्मक निर्णय घेतल्यास जगात अन्य प्रकारच्या ज्या स्पर्धा होतात, त्या स्पर्धांमध्ये बैलगाडा स्पर्धेचे नाव नोंद झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड: मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलांची सोनसाखळी हिसकावणाऱ्या इराणी टोळीचा मुख्य सूत्रधार जेरबंद!

इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, खेडसह आजुबाजूच्या तालुक्यात धरणे बांधली. उद्योगधंदे वाढवले. पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्राचा चेहरा कसा उजळेल याची काळजी घेतली. त्याचा परिणाम आज जिल्ह्याचे चित्र बदलले आहे. मात्र, आज आपण वेगळ्या संकटातून जात आहोत. एका बाजूने शेतक-याला निसर्गाशी लढा देत आपली शेती सांभाळावी लागत आहे. पण, दुसरीकडे ज्याच्या हातात देशाची सत्ता आहे, त्यांना बळीराजाबद्दल प्रेम नाही. जिल्ह्यात खेड तालुक्यात सर्वात जास्त कांदा पिकतो. मात्र, कष्टाने पिकवलेल्या या कांद्याला चांगली किंमत देण्याची ज्यांची जबाबदारी आहे, ते याकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत. उलट विविध कर बसवले, निर्यात बंदी केली. ज्यांना ख-या अर्थाने मदत केली पाहिजे, ती मदत करायची सोडून त्यांच्यासमोर संकटे वाढवली जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri sharad pawar present at bullock cart race at kelgaon criticises state government pune print news ggy 03 css
First published on: 17-12-2023 at 19:23 IST