पुणे : शाळकरी मुलीला आमिष दाखवून तिचे अपहरण करणाऱ्या तरुणाला चंदननगर पोलिसांनी अहिल्यानगर परिसरातून अटक केली. अभिषेक विजय जाधव (वय २२, सध्या रा. गणेशननगर, वडगाव शेरी, मूळ रा. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वडगाव शेरी भागातून १३ वर्षीय शाळकरी मुलीचे अपहरण करण्यात आल्याची घटना शनिवारी (५ जुलै) घडली होती. मुलगी घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.

सीसीटीव्ही चित्रीकरण, तसेच तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, जाधव याने मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याचे उघडकीस आले. जाधव आणि मुलगी अहिल्यानगर भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक अहिल्यानगरला रवाना झाले. पोलिसांच्या पथकाने अहिल्यानगरमधून अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. तिचे अपहरण करणारा आरोपी जाधव याला अटक करण्यात आली. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शाळकरी मुलीचे अपहरण प्रकरणाचा छडा पोलिसांनी २४ तासात लावून आरोपीला अटक केली. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे, उपनिरीक्षक सचिन राऊत, पोलीस कर्मचारी देवकाते यांनी ही कारवाई केली.