पुणे : ‘राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी पुणे जिल्ह्याचे मोठे योगदान असून याचे एकमेव कारण पुण्याची प्रशासकीय परंपरा आहे. हा वारसा टिकवून ठेवण्यासाठी शासकीय सेवेत रूजू झालेल्या नवीन उमेदवारांनी लोककेंद्री दृष्टीकोन ठेऊन काम करावे,’ असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शनिवारी केले. तसेच ‘आता तुम्ही शासनाचे नोकर, कर्मचारी, अधिकारी म्हणून रूजू झाला आहात. त्यामुळे या संधीकडे केवळ नोकरी म्हणून न पाहता, जबाबदारी म्हणून पहावे.’ अशी सूचना पवार यांनी केली.
राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत आयोजित रोजगार मेळाव्यात राज्यातील १० हजारांहून अधिक उमेदवारांना अनुंकपा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) लिपीक पदासाठी उत्तीर्ण झालेल्या तरुणांना नियुक्तीपत्र देण्यात आले. तत्पूर्वी पुणे जिल्ह्यातील विविध ६१ कार्यालयांतर्गत ७५९ उमेदवारांना दृकश्राव्य माध्यमातून पवार यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार बापू पठारे, भीमराव तापकीर, विभागीय आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार, प्रभारी जिल्हाधिकारी गजानन पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आणि इतर विभागातील अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘पुणे जिल्हा प्रशासकीय कामकाजात नेहमीच गतिमान आणि अग्रेसर राहिला आहे. कामात सातत्य, प्रामाणिकपणा, सचोटीमुळे पुण्यातील प्रशासन प्रशासकीय वर्तुळात नावाजलेले आहे. याच जिल्ह्यात आता तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली असून प्रशासनात काम करताना हा प्रशासकीय वारसा पुढे घेऊन जावा. आजच्या स्पर्धात्मक युगात शासकीय सेवेत नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अनेक तरूण अहोरात्र धरपडत आहे, याची जाणीव अनुकंपा तत्वावर आणि परीक्षा देऊन लिपीक म्हणून रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांनी ठेवावी. तुमच्या कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या बळावर पुणे जिल्ह्याला विशेष उंची मिळेल.
शासकीय सेवेत सर्वात महत्वाचे काम लिपिकाचे असते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला, तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कागदानुसार करण्याची जबाबदारी लिपिकाकडेच असते. त्यामुळे जनसामांन्यांना केंद्रबिंदू ठरवून काम करावे. आपल्याला शासनात समाजाच्या सेवेसाठी ही संधी मिळाली आहे. सोपवलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडावी. तुमच्या आयुष्यात नव्या पर्वाला सुरुवात आहे, असे सांगत पवार यांनी नवनियुक्त उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
अनुकंपा तत्वावरील भरती प्रक्रिया राबविताना कायदेशीर बाबी, प्रशासकीय दिरंगाई, बिंदूनामावलीतील किचकट अटी आणि तुरतुदींमुळे ही प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती. मात्र, महायुती सरकारने तातडीने निर्णय घेऊन जाचक अटी दूर करून ८० टक्के उमेदवारांची भरती प्रक्रिया या माध्यमातून पार पाडली आहे. लवकरच उर्वरित उमेदवारांना सेवेत रुजू करुण घेण्यात येईल. – अजित पवार, उपमुख्यमंत्री