पुणे : लष्करात नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका जवानाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. लष्करी गुप्तचर यंत्रणेकडून (मिलिटरी इंटलिजन्स) ही कारवाई करण्यात आली. शत्रुघ्न तिवारी (वय २६, रा. गणेशकृपा चाळ, कल्याण, जि. ठाणे) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारदार तरुण सिंहगड रस्ता परिससरात राहायला आहे. आरोपी तिवारीने लष्करात भरतीची संधी, अशी जाहिरात समाजमाध्यमात प्रसारित केली होती. जाहिरात वाचल्यानंतर तक्रारदार तरुण तिवारीच्या संपर्कात आला. तिवारीने लष्कर भरतीचे आमिष दाखवून तरुणाकडे तीन लाख रुपयांची मागणी केली.
हेही वाचा : IAS पूजा खेडकर दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणी ‘वायसीएम’च्या ‘त्या’ डॉक्टरांना क्लीन चिट! चौकशीत निर्दोष
तरुणाला ससून रुग्णालयाच्या परिसरात बोलावले. तक्रारदार तरुणाला संशय आल्याने त्याने पैसे दिले नाही. तिवारी लष्करात जवान आहे. लष्करी सेवा अर्धवट सोडून (भगोडा) तो पसार झाला होता. त्याने लष्करात नोकरीची संधी अशी जाहिरात समाजमाध्यमात प्रसारित केली होती. लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत होता. तिवारीने फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्याला ताब्यात घेण्यात आले असून, बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार तपास करत आहेत.