पुणे : भगवद्गीतेमधील संस्कृत श्लोकांचे मोडी लिप्यंतर करण्याचे शिवधनुष्य मोडीचे अभ्यासक दिलीप निकम यांनी पेलले आहे. भगवद्गीतेच्या १८ अध्यायांमध्ये असलेल्या सर्व सातशे श्लोकांचे अवघ्या दहा महिन्यांमध्ये लिप्यंतर करून निकम यांनी आपल्या पंचाहत्तरीचा ‘अमृत’योग साधला आहे.
दिलीप निकम यांनी भगवद्गीतेच्या श्लोकांचे लिप्यंतर केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस आणि ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. माजी खासदार अशोक मोहोळ, पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, पर्वती मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब गांजवे, बाळासाहेब निकम या वेळी उपस्थित होते.
बलकवडे म्हणाले, ‘मोडी लिपीचा इतिहास खूप जुना आहे. मराठी लिहिण्यासाठी वापरली जाणारी ही एक जुनी लिपी आहे. संस्कृत आणि मराठी भाषेतील उत्तम ग्रंथांचे मोडी लिपीमध्ये लिप्यंतर केल्यास नवीन अभ्यासकांमध्ये मोडी लिपीविषयी उत्सुकता निर्माण होऊन त्यांना प्रेरणा मिळेल. एके काळी मोडी लिपीचे जाणकार असलेल्या लोकांची संख्या नंतरच्या काळात कमी झाली. त्यामुळे इतिहासाच्या अभ्यासात महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या मोडी कागदपत्रांचा अभ्यास होऊ शकला नाही.’
देसाई म्हणाले, ‘एखाद्या मोठ्या ग्रंथाच्या अनुवादाचे लिप्यंतराचे काम करताना केवळ ती भाषा किंवा लिपी अवगत असणे पुरेसे ठरत नाही, तर त्या ग्रंथाला असलेले विविध संदर्भ समजणेदेखील आवश्यक असते.’