पुणे : राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी झाल्याने त्यांचे पक्षातील राजकीय वजन घटल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांमध्येही तशी कुजबूज सुरू झाली असून, आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना पुन्हा कोथरूड विधानसभा मतदारसंघातून संधी मिळण्याबाबतची साशंकताही पदाधिकारी व्यक्त करत आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे- फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री पदाबरोबरच पालकमंत्रिपदही सोपविण्यात आले.

पालकमंत्री असताना पाटील यांनी महाविकास आघाडीने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घेतलेले निर्णय रोखले होते. तेव्हापासून अजित पवार आणि पाटील यांच्यात शीतयुद्ध सुरू होते. पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर तर ते तीव्र झाले होते. सत्तेत आल्यापासून पवार पालकमंत्री होतील, अशी चर्चा सुरू झाली होती. पालकमंत्री म्हणून पाटील यांना अपेक्षित प्रभाव पाडता आला नसल्याने त्यांचे पद काढून घेतले जाईल, असे बोलले जात होते. ही शक्यता खरी ठरल्याने आता पाटील यांचे राजकीय वजन घटल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा : पुणे : सिंहगड रस्त्यावर दुचाकी विक्री दालनात आग; २० ते २५ दुचाकी जळाल्या

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळालेले असले, तरी पुणेकरांना पाटील हे कायमच ‘बाहेर’चे वाटत आले आहेत. पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाचा एक गट अद्यापही पाटील यांना आपले मानत नव्हता, तर भाजपविरोधी राजकीय पक्षांकडूनही पाटील ‘बाहेरचे’च असल्याची टीका सातत्याने केली जात आहे. त्यामुळे पाटील यांच्या रूपाने पुण्याला मंत्रिपद मिळाले असले, तरी त्यांना पुणेकर म्हणून स्वीकारले जाणार का, हा प्रश्न कायम होता. आमदार झाल्यानंतरही त्यांना पुणेकर नसल्याच्या टीकेला सामोरे जावे लागले होते.

हेही वाचा : पुणे: माजी नगरसेविकेला धमकावून बलात्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणेकरांच्या दृष्टीने महत्त्वाचे प्रश्नही त्यांना योग्य पद्धतीने हाताळता आले नाही, अशी टीका त्यांच्यावर सातत्याने होत होती. त्यातच पालकमंत्री म्हणून जबाबदारी काढून घेतल्याने त्यांच्या शहरातील वर्चस्वालाही धक्का लागल्याचे स्पष्ट होत आहे. पुढील वर्षी ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी कोथरूडमधून अनेक जण इच्छुक आहेत. पालकमंत्रिपद काढल्याने आता या इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पालकमंत्रिपद गेल्याने पाटील यांना आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळेल का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.