पुणे : दरवर्षी होळीनिमित्त शेतीमालाच्या दरात वाढ होते. यंदा होळीनिमित्त शेतीमालाच्या दरात फारशी वाढ दिसून आली नाही. प्रामुख्याने बेदाणा, गुळाच्या दरात वाढ न झाल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे. होळीच्या सणापासून धूलिवंदन, संत तुकाराम बीज, रंगपंचमी, गुढी पाडवा, राम नवमी सारखे सण एका पाठोपाठ येतात. त्यामुळे बाजारात शेतीमाला असलेली मागणी वाढते. प्रामुख्याने होळीच्या पार्श्वभूमीवर पंधरा दिवस अगोदरपासूनच बाजारात बेदाणा, साखर, गुळासारख्या शेतीमालाच्या दरात वाढ होते. पण, यंदा बाजारात तशी स्थिती दिसून आली नाही.

बेदाण्याचे दर प्रति किलो सरासरी ११० ते १७० रुपयांवर टिकून राहिले. या काळात दरवर्षी होणाऱ्या दर्जानिहाय सरासरी १३० ते २७० रुपयांपर्यंतच्या दराची यंदा प्रतिक्षाच राहिली. त्यामुळे सरासरीच्या तुलनेत फक्त ३० टक्केच शेतीमालाची विक्री होऊ शकली. अनेक शेतकऱ्यांनी दराअभावी बेदाणा विक्री थांबवून बेदाणी शीतगृहात साठवणुकीला प्राधान्य दिले आहे, अशी माहिती तासगाव (जि. सांगली) येथील बेदाणा उत्पादक प्रशांत जाधव यांनी दिली.

हेही वाचा : शिवतारे गरजले, “बारामतीमधून पवार यांची हुकूमशाही संपविण्यासाठीचे माझे धर्मयुद्ध..”

दर्जेदार गुळासाठी कोल्हापूर, कराडची बाजारपेठ जगात प्रसिद्ध आहे. सणांच्या पार्श्वभूमीवर गुळाच्या दरात यंदा वाढ झाली नाहीच. सध्या गुळाचा हंगामा अंतिम टप्प्यात आला आहे. गुळाला सरासरी ३८०० ते ४००० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मागील महिन्यात आलेली काहीशी तेजीही पूर्णपणे ओसरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. गुळाला उत्पादन खर्चा इतकीही दर मिळत नाही. चांगला दर मिळत नसल्यामुळे कोल्हापूर आणि कराड येथील बाजारात होणारी गुळाची आवक ही मंदावली आहे. शीतगृहासाठी होणारी खरेदीही थांबली आहे.

हेही वाचा : पुणे : निवडणुकीतील गैरप्रकारांवर २६४ पथकांकडून देखरेख

गुळाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. यंदाचा संपूर्ण हंगाम गुळाला चांगला दर मिळाला नाही. सणांच्या पार्श्वभूमीवरही चांगला दर मिळाला नाही. एकीकडे मजुरी, वाहतुकीत मोठी वाढ झाल्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. दुसरीकडे गुळाच्या दरात अपेक्षित वाढ झाली नाही. यंदाचा हंगाम फारसा फायदेशील ठरला नाही, असे कराड येथील गुळाचे उत्पादक विराज पाटील यांनी सांगितले.