पुणे : पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघाचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मतदार संघातील गोखलेनगर भागात ६० लाख लिटर पाण्याच्या टाकीचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी तीन वाजता केले जाणार होते. पण त्यापूर्वीच आमदार रविंद्र धंगेकर, माजी आमदार मोहन जोशी आणि माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह पाण्याच्या टाकीचे उद्घाटन केले. त्या दरम्यान पोलीस अधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादाचा प्रकार देखील घडला. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर या घटनेचे वार्तांकन करण्यास येणार्‍या पत्रकारांना आतमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले होते. त्यावरून देखील पत्रकार आणि पोलीस अधिकार्‍यांमध्ये वादाचा प्रकार घडला.

हेही वाचा : पुणे : पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव; खून करून तरुण पसार

यावेळी आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले की, “आजपर्यंत काँग्रेस पक्षाने केलेल्या कामाचं श्रेय भाजपने घेतलं आहे. त्या बाबतची पुनरावृत्ती पुण्यातील गोखलेनगर भागात दिसून आली आहे. काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी गोखलेनगर भागातील नागरिकांना पाणी मिळावे, यासाठी महापालिका प्रशासनासोबत वेळोवेळी पाठपुरावा केला. आज खऱ्या अर्थाने या भागातील नागरिकांना पाणी मिळणार आहे. त्या टाकीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. पण येथील भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी त्यांचा फोटो टाकला नाही किंवा कार्यक्रमाला निमंत्रण देखील दिले नाही. या निषेधार्थ आम्ही कार्यक्रमापूर्वीच उद्घाटन केले.”

हेही वाचा : “मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री स्तरावर…”, अजित पवार म्हणाले, “चर्चेतून मार्ग काढण्याचा…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच धंगेकर पुढे म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांचा सन्मान करत असतात. मात्र, आज अजित पवार ज्या पक्षासोबत सत्तेमध्ये सहभागी झाले आहेत त्या नेत्यांची अजित पवार नक्कीच कानउघाडणी करतील.” या प्रकाराबाबत अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे धंगेकरांनी म्हटले आहे.