पुणे : गेल्या २४ तासांत पुणे शहर आणि जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. सर्वदूर जोरदार सरी कोसळल्या असून, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चार-पाच दिवसापासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. विशेषतः घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण जास्त आहे. मात्र, बुधवारी सायंकाळपासूनच जोरदार पाऊस सुरू झाला.

हवामान विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, ताम्हिणी येथे २३० मिलीमीटर, कुरवंडे येथे २१९ मिलीमीटर, गिरीवन येथे १६०, निमगिरी येथे ११६, भोर येथे १०९, माळीण येथे ६९, तळेगाव येथे ६५, लवळे येथे ६०, एनडीए येथे ५२, नारायणगाव येथे ४८.५, पाषाण येथे ३३, तर शिवाजीनगर येथे ३१.५ मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.