पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) पक्षविस्तार करण्याच्या दृष्टीने शहर कार्यकारिणीच्या रचनेमध्ये बदल करताना दोन शहराध्यक्षांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार पूर्व भागासाठी माजी आमदार सुनील टिंगरे, तर पश्चिम विभागाच्या शहराध्यक्षपदी माजी सभागृहनेते सुभाष जगताप यांची नावे रविवारी जाहीर करण्यात आली.

कल्याणीनगर येथील ‘पोर्शे’ कार अपघात प्रकरणात फटका बसलेले टिंगरे यांचे यानिमित्ताने पुनर्वसन करून त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न झाला असून, जगताप आणि कार्याध्यक्षपदी हाजी फिरोझ शेख यांची नियुक्ती करून जातीय समीकरणे जुळविण्यात आली आहेत.

दरम्यान, या दोन शहराध्यक्षांच्या मदतीला प्रदीप देशमुख, रूपाली ठोंबरे, हाजी फिरोझ शेख आणि अक्रूर कुदळे या चौघांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या पदासाठी सुनील टिंगरे, सुभाष जगताप यांच्यासह आमदार चेतन तुपे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रदीप देशमुख यांची नावे चर्चेत होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनापूर्वी नव्या शहराध्यक्षांची नियुक्ती होईल, असे पक्षाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन शहराध्यक्षांची नियुक्ती करून धक्कातंत्र राबविले आहे.

आगामी महापालिका निवडणूक आणि पक्ष विस्तार करण्याच्या दृष्टीने शहर कार्यकारिणीच्या रचनेत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार पूर्व भागातील कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि वडगावशेरी या चार विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सुनील टिंगरे यांना देण्यात आली आहे. तर या विभागाच्या कार्याध्यक्षपदासाठी रूपाली ठोंबरे आणि हाजी फिरोज शेख यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम विभागातील पर्वती, खडकवासला, कोथरूड आणि शिवाजीनगर या मतदारसंघांच्या शहराध्यक्षपदी सुभाष जगताप यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या मदतीला प्रदीप देशमुख आणि अक्रूर कुदळे हे कार्याध्यक्ष असणार आहेत. या सर्वांना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नियुक्तिपत्रे दिली असून आमदार चेतन तुपे यांनी त्यांची नावे रविवारी जाहीर केली.