पुणे : गणेशोत्सव तसेच पाठोपाठ येत असलेल्या नवरात्रोत्सवात नागरिकांना तसेच मंडळांना त्रास होऊ नये, यासाठी महापालिकेच्या पथ विभागाने शहरातील महत्वाच्या रस्त्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्वाची मंडळे असलेल्या आणि मिरवणूक काढण्यात येणाऱ्या रस्त्यांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक अभियंत्यावर जबाबदारी निश्चित करुन संबधित रस्त्यावर उत्सवाच्या काळात खड्डे पडू नयेत, यासाठी विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महापालिकेचे पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी ही माहिती दिली. गणेशोत्सवासाच्या काळात रस्त्यावर कोणतेही अडथळे निर्माण होऊन उत्सवात विघ्न येऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. ज्या मार्गावर गणेशोत्सवासाठी मोठी गर्दी होते. तसेच मिरवणुका काढल्या जातात.

अशा लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, नेहरू रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्ता तसेच शास्त्री रस्त्यासह अन्य महत्वाच्या रस्त्यांवर उत्सवाच्या काळात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी महापालिका प्रयत्न करणार आहे. या रस्त्यांवरील त्रुटी दूर करण्यासाठी महापालिकेच्या पथ विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असून हे अधिकारी दररोज त्यांना जबाबदारी दिलेल्या रस्त्याची पाहणी करुन त्यातील त्रुटी दूर करणार आहेत.

उत्सव साजरा करताना मंडळांना आवश्यक असलेली आणि महापालिकेच्या माध्यमातून केली जाणारी कामे पूर्ण करण्यास प्राधान्यक्रम राहणार आहे. यासाठी संबधित मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवापूर्वी तसेच उत्सवाच्या काळात संबधित अभियंत्यावर या रस्त्याची दररोज पाहणी करुन त्यामध्ये आढळलेल्या अडचणी दूर करण्याची जबाबदारी राहणार असल्याचे पावस्कर यांनी सांगितले.

मंडळांसाठी नियमावली

गणेशोत्सव तसेच नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने महापालिकेने मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे. मांडव टाकण्यासाठी खोदलेले खड्डे स्वखर्चाने बुजवावेत, उत्सवानंतर तीन दिवसांत मंडप, सजावट तसेच इतर अतिक्रमण काढून तातडीने जागा माेकळी करावी अशा सूचनांचा या नियमावलीत समावेश आहे. महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या नियमावलीमध्ये २०२२ पासून पाच वर्षापर्यंत मंडप, कमानी यासाठी परवानगी घ्यावी लागणार नाही. नवीन गणेश मंडळांना मात्र २०१९ च्या नियमावलीनुसार परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच विविध परवानगी घेण्यासंदर्भात पाेलीस, महापालिका यांनी एक खिडकी याेजना सुरु करणार आहे.

तक्रारीसाठी हेल्पलाइन

मंडपासाठी खोदलेले खड्डे सिमेंट क्राँक्रिटने दुरुस्त करणे बंधनकारक असणार आहे. नागरिकांना वाहतुकीला अडथळा हाेणार नाही, तसेच त्यांना ध्वनिप्रदूषणाचा त्रास होणार नाही याची काळजी मंडळाने घ्यावी, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. तसेच तक्रारीसाठी महापालिकेने हेल्पलाईन सुरु केली आहे. नागरिकांना http://complaint.punecorporation.org, या संकेतस्थावर तसेच टोल फ्री क्रमांक १८०० १०३ ०२२२, माेबाईल अँप : PUNE Connect, व्हॉट्स अप नंबर : ९६८९९००००२ येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.