पुणे : नाशिक लोकसभा मतदारसंघातून छगन भुजबळ यांना माघार घेण्यास भाग पाडणाऱ्या महायुतीच्या भूमिकेचा निषेध करत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद भुजबळ यांच्यासाठी सरसावली आहे. यासंदर्भात परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करूनच भविष्यातील निर्णय घेण्यात येणार आहे.  

नाशिक लोकसभा मतदारसंघातून भुजबळ यांनी निवडणूक लढविण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले होते. मात्र, त्या आदेशाची पायमल्ली करीत राज्यातील महायुतीच्या सरकारमधील शुक्राचार्यांनी आठवड्यापेक्षा जास्त कालावधी घेऊन कोणताही निर्णय न घेतल्याने उद्विग्न होत भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. यामुळे राज्यातील ओबीसींना डावलले जात असल्याची भावना ओबीसी बांधवांच्या मनात निर्माण झाली आहे. ओबीसी समाज अस्वस्थ असून त्यांच्यात धुमसत असलेल्या या असंतोषाचा मतदानावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा इशारा समता परिषदेचे पुणे विभाग अध्यक्ष प्रितेश गवळी यांनी शनिवारी दिला.

हेही वाचा : समलिंगी पतीकडून छळ; महिलेची पोलिसांकडे तक्रार, पतीसह सासू, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या दोन दिवसांत समता परिषद आणि इतर ओबीसी संघटना बैठका घेऊन विचारविनीमय करणार आहेत. यासंदर्भात छगन भुजबळ यांचा निर्णय अंतिम असून त्यांच्या नेतृत्वाखाली अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे, असे गवळी यांनी सांगितले. मात्र, निवडणुकीतून माघार घेत भुजबळ यांनी स्वत:ची सुटका करून घेतली आहे का?, या प्रश्नाला त्यांनी बगल दिली.