पुणे : अजित पवार यांनी शिंदे, फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी विशेषतः अजित पवार यांनी एकाच कार्यक्रमात एकत्र येण्याचे टाळले आहे. नमो महारोजगार मेळाव्यात एकाच व्यासपीठावर येऊनही दोघांमध्ये संवाद झाला नव्हता. मात्र, आता दोघेही पुन्हा एकाच व्यासपीठावर येणार की नाही, हे रविवारी पुण्यात समजणार आहे.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या (व्हीएसआय) नियामक मंडळाची सभा रविवारी (१० मार्च) संस्थेच्या मांजरी येथील मुख्यालयात आयोजित करण्यात आली आहे. व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, डॉ. इंद्रजीत मोहिते, जयप्रकाश दांडेगावकर, विशाल पाटील, बी. बी. ठोंबरे, श्रीराम शेटे, नरेंद्र घुले पाटील, शिरीषकुमार नाईक, अशोक पवार, आमदार बबनराव शिंदे, अरविंद गोरे, सतेज पाटील, प्रकाश आवाडे, विश्वजीत कदम, बाळासाहेब पाटील, दिलीप देशमुख, राजेश टोपे, गणपतराव तिडके, रोहित पवार, हर्षवर्धन पाटील असे ४१ सदस्य आहेत.

हेही वाचा : एमएचटी-सीईटीसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत करता येणार अर्ज?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हीएसआयच्या संचालक मंडळाची बैठक गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात झाली. सत्तेत सहभागी झाल्यानंतर प्रथमच सार्वजनिक व्यासपीठावर दोन्ही पवार एकाच व्यासपीठावर येणार होते. परंतु अजित पवार यांनी बैठकीला जाणे टाळले आणि दौंडच्या दिशेने रवाना झाले होते. शरद पवार आणि अजित पवार गेल्या वर्षी १२ ऑगस्ट रोजी देखील एकत्र येणार होते. साखर कारखाना महासंघाच्या वतीने साखर कारखानदारांसाठी कार्यशाळा त्यावेळी आयोजित केली होती. मात्र, त्याच दिवशी पुण्यातील एनडीए (चांदणी) चौक पुलाचे उद्घाटन होते. त्यामुळे अजित पवार आले नाहीत. परंतु शरद पवार आणि अजित पवार यांच्या सोबत सत्तेत सहभागी झालेले सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील एका व्यासपीठावर आले होते. नुकत्याच बारामती येथे झालेल्या नमो महारोजगार मेळाव्याला शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे तिघेही व्यासपीठावर एकत्र होते. मात्र, त्यांच्यात संवाद झाला नव्हता. त्यामुळे रविवारी व्हीएसआयच्या नियामक मंडळाच्या सभेच्या निमित्ताने हे दोघे एकत्र येणार की नाही, याकडे लक्ष लागून राहीले आहे.