पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या पुणे दौऱ्याच्या वेळी, बंदोबस्तावर असणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करणारे भाजपचे पदाधिकारी प्रमोद कोंढरे यांचा तीव्र निषेध महायुतीतील शिवसेनेने (शिंदे) केला आहे. कोंढरे यांना आलेला सत्तेचा माज आम्ही निश्चित उतरवू, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षाचे महानगरप्रमुख आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी बुधवारी केली.

महाराष्ट्रात युतीचे सरकार आहे त्याचे आम्हाला भान आहे. मात्र, पुण्यातील भाजपचा पदाधिकारी महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करीत असेल तर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या या पुण्यात शिवसेना गप्प बसणार नाही. या संदर्भात पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुण्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्याचा माज आम्ही उतरवू असे सांगून रवींद्र धंगेकर म्हणाले की, यापूर्वी देखील प्रमोद कोंढरे याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या एका महिला पदाधिका-याचाही विनयभंग केला होता आणि त्याचा गुन्हा ही नोंदवण्यात आला आहे. त्याचाही पाठपुरावा शिवसेनेतर्फे केला जाईल. हे प्रकरण दाबले जाणार नाही, याची ग्वाही आम्ही पुणेकरांना देतो. या स्त्रीलंपट प्रमोद कोंढरे सारख्या पदाधिकाऱ्याला, मित्रपक्ष भाजपने पक्षातून त्वरित काढून टाकावे अशी मागणी करून, याप्रसंगी कसब्याचे भाजपचे आमदार हेमेंत रासने उपस्थित होते त्यांनी या बाबतीतचे मौन सोडवे असे आव्हान धंगेकर यांनी दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केवळ पुण्यातच नव्हे तर देशात महिला सुरक्षित राहिल्या पाहिजे, ही शिकवण हिंदू हृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी दिली असून, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीदेखील महिलांच्या सुरक्षेबाबत अतिशय कडक धोरण स्वीकारले आहे. त्यामुळेच, वेळप्रसंगी युतीचाही विचार न करता, महिला पोलीस अधिकाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याचा माज उतरवून, पुण्यातील समस्त महिला वर्गाला आम्ही आधार देवू, त्यासाठी वेळप्रसंगी तीव्र आंदोलन करू. असे रवींद्र धंगेकर म्हणाले.