पुणे : खेळताना पाण्यात गेलेला चेंडू काढणे रोहन सुरवसे या दहा वर्षांच्या मुलाच्या जीवावर बेतल्याची घटना वडगाव धायरी येथील गारमाळ परिसरात सोमवारी दुपारी घडली. कॅनाॅलच्या पाण्यात बुडून रोहन (रा. गल्ली क्र. १७, गारमाळ, धायरी) मृत्युमुखी पडल्याने परिसरावर शोककळा पसरली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन, साईराज जेधे आणि अयान नासिर शेख ही तीन मुले कॅनॉलच्या कडेला क्रिकेट खेळत होती. खेळताना त्यांचा चेंडू कॅनॉलच्या पाण्यात गेला. तो काढण्यासाठी दोघे कॅनॉलच्या पाण्यात उतरली. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे हे दोघे जण पाण्यात वाहून जाऊ लागले. दरम्यान या वेळी वरती असलेल्या मुलाने आरडाओरडा केल्याने येथून जात असलेल्या प्रज्वल दीपक जंवजाळ या मुलाने पाहिले. त्याने क्षणाचाही विचार न करता आणि आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी घेऊन पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊन बुडणाऱ्या एका मुलाला कसे बसे बाहेर काढले. परंतु, तोपर्यंत दुसरा मुलगा कॅनॉलच्या मध्यभागी जाऊन पाण्यात बुडाला.
हेही वाचा : डॉ. अजित रानडे यांना हटवण्याची प्रक्रिया ‘वेगवान’; प्रभारी कुलगुरूंचीही नियुक्ती
घटनेची माहिती समजताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राघवेंद्रसिंह क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव हे पोलीस कर्मचाऱ्यांसमवेत तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी अग्निशमन दलाच्या जवानांना दूरध्वनीद्वारे बोलावून घेत नागरिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू केले. नवले अग्निशमन दलाचे केंद्र प्रमुख प्रकाश गोरे, चालक बाळा पांगारे, कैलास आखाडे, बालाजी आखाडे, संकेत गुरव, राजेंद्र भिलारे आणि आणि पीएमआरडीएच्या जवानांनी बराच वेळ कॅनॉलमध्ये दोर टाकून आणि पाण्यात बुड्या मारून या मुलाला शोधण्याचे प्रयत्न केले. परंतु संध्याकाळपर्यंत हा बुडालेला मुलगा सापडला नाही. या वेळी तांडेल रमेश चव्हाण हे सुट्टीवर होते. आपली गाडी कॅनॉलच्या दिशेने गेल्यामुळे त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून कर्तव्य बजावले.
हेही वाचा : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत तातडीने मिळणार वैद्यकीय उपचार! आरोग्य विभागाचा उपक्रम जाणून घ्या…
रोहनच्या आईचा हंबरडा
मुलगा पाण्यात बुडाल्याची बातमी कळताच रोहनच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला. रोहनची घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्याचे वडील प्रकाश हे पोकलेन मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करतात. तर आई घरकाम करते. त्याला एक लहान भाऊ आहे. एक महिन्यापूर्वीच हे कुटुंब गावावरून पोटाची खळगी भरण्यासाठी पुण्यात आले होते. मुलाच्या दुर्देवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.