पुणे : चेन्नई – पलिताना भारत गौरव एक्स्प्रेसमधील सुमारे १०० प्रवाशांना अन्नातून विषबाधा झाली. या प्रवाशांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे मंगळवारी (ता. २८) मध्यरात्री तासभर पुणे स्थानकावर ही गाडी थांबवून प्रवाशांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर ही गाडी मार्गस्थ झाली. दरम्यान, गाडीतील खाद्यपदार्थ आणि पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी रेल्वेच्या अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

चेन्नईतील चंद्रप्रभू नया मंदिर या संस्थेने धार्मिक सहलीसाठी ही पूर्ण गाडी आरक्षित केली होती. या गाडीत एक हजार ८० प्रवासी होते. गाडीतील जेवणाची व्यवस्थाही संस्थेनेच केली होती. त्यामुळे गाडीत पँट्री कारही होती. या गाडीतील काही प्रवाशांना पोटदुखी, उलट्या आणि जुलाब होत असल्याची माहिती मंगळवारी (ता. २८) रात्री १०.३० वाजता रेल्वेच्या पुणे नियंत्रण कक्षाला मिळाली. याबाबत विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इंदू दुबे यांना माहिती देण्यात आली.

हेही वाचा : राज्यात शनिवारपासून हुडहुडी…जाणून घ्या कोणत्या ठिकाणी पारा उतरणार

ही गाडी रात्री ११.४० वाजता पुणे स्थानकावर पोहोचली. तेव्हा डॉक्टर आणि वैद्यकीय सहायकांच्या तीन पथकांनी उलट्या आणि जुलाबाचा त्रास झालेल्या सुमारे १०० प्रवाशांना इलेक्ट्राल पावडर व इतर वैद्यकीय उपचार दिले. काही वेळाने प्रवाशांची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर गाडी रात्री १२.३० वाजता पुढे पाठवण्यात आली.

असे झाले उपचाराचे नियोजन

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विभागीय रेल्वे रुग्णालयचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. सजीव एन. यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्याशी चर्चा करून परिस्थिती हाताळण्याबाबत आराखडा तयार केला. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कळवण्यात आले. डॉ. सजीव एन. यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे रुग्णालय, ससून रुग्णालय आणि रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर, वैद्यकीय सहायक आणि वाणिज्य, रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांसह ६० जणांचे पथक तत्काळ तयार करण्यात आले. गाडी पुण्याला पोहोचण्यापूर्वी आवश्यक औषधे, चिकित्सा उपकरणे यांच्यासह पुणे स्थानकावर तयार ठेवण्यात आली.

हेही वाचा : पुणेकरांच्या जीवाशी खेळ; खडकवासला धरणात मिसळतेय दररोज एवढे सांडपाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“एका खासगी संस्थेने ही पूर्ण गाडी आरक्षित केली होती. जेवणासाठी गाडीत पँट्री कारचा डबा होता. त्याची व्यवस्थाही याच संस्थेकडे होती. याप्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर खाद्यपदार्थ, खाद्यतेल, खाद्यरंग आणि पाण्याचे नमुने जप्त करून ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.” – डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे