पुणे : पुणे शहराला पिण्यासाठी खडकवासला धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणाच्या आसपासच्या २४ ग्रामपंचायती, हॉटेल, रिसॉर्ट यांमधून कोणतीही प्रक्रिया न करता काही लाख लिटर सांडपाणी थेट खडकवासला धरणात सोडले जात आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत आणि त्यानंतर तयार केलेल्या अहवालात ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

चहुबाजूने वाढणाऱ्या पुण्याचे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले आहे. त्यामुळे शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या खडकवासला धरण, सिंहगड किल्ला येथे शनिवार-रविवार आणि सुट्यांच्या दिवशी पर्यटकांची वर्दळ असते. खडकवासला धरणाच्या परिसरात गेल्या काही वर्षांत प्रचंड हॉटेल, रिसॉर्ट उभी राहिली आहेत. हे उभारताना बांधकामासाठी आणि यातून निर्माण होणाऱ्या सांडपाण्याच्या प्रक्रियेबाबत ग्रामपंचायतींकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. तसेच ना-हरकत प्रमाणपत्रही घेण्यात आलेले नाही.

हेही वाचा : मोझांबिककडून भारताची ‘तूरकोंडी’… दरात तेजी राहणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवेली, वेल्हे या दोन तालुक्यांतील २४ ग्रामपंचायतींधून लाखो लिटर सांडपाणी थेट धरणात सोडण्यात येत आहे. या ग्रामपंचायतींमधून सुमारे ५५ हजार लोकसंख्या आहे. खडकवासला धरणाच्या परिसरात ५०० पेक्षा जास्त हॉटेल, रिसॉर्ट आहेत. या सर्वांमधून एक लाख ९४ हजार ५८० लिटर प्रतिदिन सांडपाणी निर्माण होत असल्याचे जिल्हा परिषदेने तयार केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी दीर्घकालीन उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.