पुणे : वातानुकूलित (एसी) टॅक्सीचे दर वाढविण्यासाठी टॅक्सी संघटनांनी वारंवार आंदोलन केले होते. यानंतर पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३७ रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २५ रुपये दराचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तयार केला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे हे नवीन दर आता लागू झाले असून ओला, उबरसह इतर वातानुकूलित टॅक्सीच्या दरांमध्ये वाढ झाली आहे.
काळ्या पिवळ्या टॅक्सीचा दर मागील वर्षी १७ एप्रिलला पहिल्या दीड किलोमीटरला ३१ रुपये व पुढील प्रत्येक किलोमीटरला २१ रुपये करण्यात आला होता. त्या वेळी सीएनजीचा दर हा ८६ रुपये किलो होता. सीएनजी दरामध्ये सध्या वाढ झाली नसल्यामुळे काळ्या पिवळ्या टॅक्सीचा एप्रिलमधील दर बदलण्यात आलेला नाही. खटुआ समितीने काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या दरापेक्षा वातानुकूलित कॅबला २० टक्के दरवाढ करण्याची शिफारस केलेली आहे. या शिफारशीनुसार वातानुकूलित टॅक्सीचा दर हा पहिल्या दीड किलोमीटरसाठी ३७ रुपये आणि पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २५ रुपये करण्यात आला आहे.
आणखी वाचा-पुणे: वाघोलीत शाळकरी मुलीचा वडिलांकडून खून
मागील महिन्यात आरटीओत टॅक्सी, रिक्षाचालक मालक संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय भोर, महाराष्ट्र रिक्षा पंचायत व ऑटो ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे आणि इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांच्यासह अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यावेळी वातानुकूलित टॅक्सीच्या भाडेदरातील वाढीचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर सर्वांना सहमती दर्शवली होती. त्यानंतर हा प्रस्ताव आरटीओकडून प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला होता. अखेर यावर प्राधिकरणाकडून शिक्कामोर्तब झाल्याने हे नवीन दर लागू झाले आहेत.
टॅक्सीचा नवीन भाडेदर (रुपयांत)
अंतर | काळी पिवळी टॅक्सी | वातानुकूलित टॅक्सी |
पहिल्या दीड किलोमीटरसाठी | ३१ | ३७ |
त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी | २१ | २५ |