पुणे : राज्यातील ६१ संस्थांच्या ९३ तुकड्यांना द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रमांसाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील चार कनिष्ठ महाविद्यालयांचा समावेश आहे.
राज्य सरकारच्या कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता विभागाने द्विलक्ष्यी व्यवसाय अभ्यासक्रमाच्या सध्याच्या, तसेच नवीन संस्थेत नवीन किंवा अधिकच्या तुकड्यांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्त्वावर व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
‘अभ्यासक्रमांच्या नवीन किंवा अधिकच्या तुकड्या सुरू करण्यास कायमस्वरूपी विनाअनुदान तत्त्वावर मान्यता देण्यात आली असली, तरी भविष्यात कोणत्याही प्रकारचे अनुदान किंवा आर्थिक मदत दिली जाणार नाही. सरकारने निश्चित केलेले शिक्षण शुल्कच विद्यार्थ्यांकडून आकारणे संस्थेला बंधनकारक असेल, जादा शुल्क आकारता येणार नाही,’ असे याबाबतच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
पुणे जिल्ह्यातील बारामती येथील अनेकान्त एज्युकेशन सोसायटी संचालित तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात ऑरगॅनिक ग्रोवर, इरिगेशन सर्व्हिस टेक्निशिअन या अभ्यासक्रमांना, चिखली येथील सुभद्रा एज्युकेशन सोसायटी संचालित एसएनबीपी ज्युनिअर कनिष्ठ महाविद्यालयात ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर, फिल्ड टेक्निशिअन – कम्प्युटिंग ॲण्ड पेरिफेरल्स या अभ्यासक्रमांना, नऱ्हे येथील आदित्य एज्युकेशन फाउंडेशनच्या पॅराडाइज कनिष्ठ महाविद्यालयात ज्युनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर, फिल्ड टेक्निशिअन-कम्प्युटिंग ॲन्ड पेरिफेरल, तर निमगाव केतकी, इंदापूर येथील पूना डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन संचालित श्री केतकेश्वर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात ऑरगॅनिक ग्रोवर, इरिगेशन सर्व्हिस टेक्निशिअन या अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आली आहे.