हवामानशास्त्र विभागाचा अंदाज ; आगमनासाठी अनुकूल परिस्थिती

दक्षिण कोकण आणि गोव्याच्या काही भागात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मान्सून) आगमन होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. पुढच्या ४८ तासात मान्सूनचे या भागांसह इतर काही भागांमध्ये मार्गक्रमण होण्याची शक्यता ‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’ने (आयएमडी) गुरुवारी संध्याकाळी वर्तवली.

गुरुवारी सकाळी झालेल्या नोंदींनुसार कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. राज्याच्या उर्वरित भागातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. शुक्रवारपासून पुढे १३ जूनपर्यंत दक्षिण कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी पुन्हा पावसाचा अंदाज आहे. यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. शुक्रवारी विदर्भात गडगडाटी वावटळीसह पावसाची शक्यता आहे, तर ११ व १३ जूनला दक्षिण मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकेल.

सध्या मध्य अरबी समुद्राचा काही भाग, केरळ आणि तमिळनाडूचा उर्वरित भाग, कर्नाटकचा किनारपट्टीचा बहुतेक भाग आणि दक्षिण कर्नाटकच्या आतील भागात मान्सूनचे मार्गक्रमण झाले आहे.

आंध्र प्रदेशची किनारपट्टी, रायलसीमा भाग आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांतही मान्सून पोहोचला आहे. आता पुढच्या ४८ तासांत मध्य अरबी समुद्राचा आणखी भाग, कर्नाटकचा किनारी तसेच दक्षिण व उत्तरेकडील आतील भाग, दक्षिण कोकण आणि गोव्याचा काही भाग, आंध्र किनारा, रायलसीमा आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असल्याचे विभागाने म्हटले आहे.

पुण्यात मंगळवापर्यंत पाऊस शक्य

पुणे आणि परिसरात शुक्रवारपासून पुढे मंगळवापर्यंत काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांत ढगांच्या गडगडाटासह शुक्रवारी पावसाची शक्यता आहे. शनिवारी व रविवारीही अधूनमधून हलक्या पावसाच्या सरी पडतील. नंतरही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. सध्या पुण्यातील कमाल तापमान खाली आले आहे. येते सहा दिवस पुण्यात दिवसाचे तापमान ३३ अंश सेल्सिअस ते ३१ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.