पुणे : यंदा पावसाचा जोर सुरू असल्याने हवेतील ओलसरपणा वाढला आहे. हा ओलसरपणा अनेक वेळा घरांमध्येही आढळून येतो. यामुळे श्वसनविकाराच्या तक्रारी सध्या वाढल्या आहेत. दमा असलेल्या रुग्णांना प्रामुख्याने त्रास वाढलेला दिसून येत आहे. याचबरोबर ॲलर्जीच्या तक्रारीही वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्यतज्ज्ञांनी काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
यंदा पाऊस जास्त पडत असल्याने हवेतील ओलसरपणा वाढला आहे. त्याचाच परिणाम होऊन घरांतील हवाही ओलसर होते. त्यातून या हवेत काही बुरशीजन्य आणि ॲलर्जी निर्माण करणारे घटक निर्माण होतात. दम्यासह इतर श्वसनविकार असलेल्या रुग्णांना यामुळे त्रास सुरू होतो. याचबरोबर श्वसन विकार नसलेल्या रुग्णांनाही दीर्घकाळ या हवेत राहिल्यास त्रास उद्भवतो. यात प्रामुख्याने नाक वाहणे, सतत शिंका आणि त्वचेवर खाज सुटणे अशी लक्षणे दिसून येतात. दमा असलेल्या रुग्णांना हा गंभीर स्वरूपाचा त्रास सुरू होऊन त्यांना डॉक्टरांकडून उपचार घेण्याची वेळ येत आहे.
हेही वाचा…पिंपरी : खड्ड्याने घेतला महिलेचा जीव
याबाबत ससून रुग्णालयातील श्वसनविकार विभागाचे प्रमुख डॉ. संजय गायकवाड म्हणाले की, अनेक घरांच्या छतावरून पावसाचे पाणी वाहून न गेल्याने भिंती ओलसर होतात. या भिंतीवर बुरशी निर्माण होते. ही बुरशी ॲलर्जी निर्माण करणारे असतात. प्रामुख्याने दम्याचा विकार असलेल्या रुग्णांना त्रास वाढतो. त्यामुळे इतर ऋतुंच्या तुलनेत त्याला औषधे घेण्याची आवश्यकता निर्माण होते. श्वसनास त्रास अथवा चालताना धाप लागल्यास रुग्णांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. योग्य औषधोपचारामुळे रुग्णांची या त्रासापासून मुक्तता होते.
हवेतील ओलसरपणा वाढल्याने दम्याच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. याचबरोबर अनेक जणांमध्ये दीर्घकाळ थकवा येण्यासारखी लक्षणे दिसून येत आहेत. हवेतील बुरशीजन्य घटकांच्या वाढीमुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. त्यावर तातडीने उपचार करण्याची आवश्यकता असते. – डॉ. महावीर मोदी, श्वसनविकारतज्ज्ञ, रूबी हॉल क्लिनिक
पावसाळ्यात घरांच्या भिंती ओलसर राहू नयेत, यासाठी काळजी घ्यावी. घरातील हवा कोंदट न राहता खेळती राहील, हे पाहावे. दम्यासह इतर श्वसनविकार असलेल्या रुग्णांसाठी ही काळजी गरजेची आहे. सध्या नेहमीपेक्षा श्वसनविकार असलेल्या रुग्णांची संख्या २० टक्क्यांनी वाढलेली आहे. – डॉ. संजय गायकवाड, प्रमुख, श्वसनविकार विभाग, ससून रुग्णालय
लक्षणे कोणती
-नाक वाहणे अथवा वारंवार शिंका
-श्वास घेण्यास त्रास
-चालताना अथवा जिने चढताना धाप
-थकवा जाणविणे
-त्वचेला खाज