इंदापूर : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाजपमध्ये प्रवेश केलेले सोनाई उद्योग समूहाचे प्रवीण माने, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी उपनगराध्यक्ष भरत शहा आदी प्रमुख राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा इंदापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत पणाला लागणार आहे.
या नगरपरिषदेमध्ये १७ नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष पद होते. नवीन प्रभाग रचनेमध्ये तीन नगरसेवकांची संख्या वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांची कर्मभूमी इंदापूर आहे. संघर्षाच्या काळातही गारटकर यांनी हर्षवर्धन पाटील मंत्री असतानाही कोणत्याही पक्षाचा आधार न घेता स्वबळावर इंदापूर नगरपरिषद कित्येक वर्षे ताब्यात ठेवली होती.
सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची राजकीय ताकद ही गारटकर यांच्या पाठीशी आहे. गारटकर यांनी इंदापूर शहरात तळ ठोकला असून, गारटकर यांच्या कुटुंबातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की अन्य उमेदवार असणार, याबाबत उत्सुकता आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सध्या शांत भूमिका घेतली असली तरी त्यांची ही वादळापूर्वीची शांतता असल्याची चर्चा आहे. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेले सोनाई उद्योग समूहाचे प्रवीण माने यांचे वास्तव्य इंदापूर शहरात आहे. त्यांच्या समूहाचे कार्यक्षेत्र या परिसरात आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये माने यांनी लक्ष वेधून घेतले होते. नगरपरिषदेच्या निवडणुकीतही माने यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. भाजपमधील इच्छुकांच्या माने यांनी मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे.
माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांनी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार, हे अद्यापही स्पष्ट केलेले नाही. गेल्या निवडणुकीत ते हर्षवर्धन पाटील यांच्याबरोबर होते. शहा पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवतात की अपक्ष निवडणूक लढवतात, यावर निवडणुकीची रंगत अवलंबून आहे.
इंदापूरच्या माजी नगराध्यक्षा अलका ताटे यांचे पती माजी नगरसेवक प्रा. कृष्णा ताटे हे इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या माध्यमातून निवडणूक लढविणार आहेत. या प्रमुख राजकीय नेत्यांमुळे इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक ही लक्षवेधक ठरण्याची शक्यता वर्तविण्यत येत आहे. दरम्यान, इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने चुरस निर्माण झाली आहे. त्यासाठी इच्छुकांची गर्दी आहे.
