पुणे : बॅटरीची अदलाबदल करता येणारा इलेक्ट्रिक ट्रक हे मालवाहतूक क्षेत्रातील क्रांतिकारी पाऊल आहे. ही भारतातील ट्रक क्षेत्रातील ‘टेस्ला मोमेंट’ आहे. यातील तंत्रज्ञान आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन आगामी काळात या क्षेत्राचा मोठ्या प्रमाणात विस्तार होईल. राज्य शासन मुंबई-पुणे इलेक्ट्रिक कॉरिडॉरसारखे अन्य कॉरिडॉर करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले.

निघोजे येथील ब्ल्यू एनर्जी मोटर्सच्या इलेक्ट्रिक ट्रकच्या अनावरणप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, महेश लांडगे, बाबाजी काळे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, ब्ल्यू एनर्जी मोटर्सचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध भुवलकर, धीरेंद्र शास्त्री बागेश्वरबाबा, प्रशांत रुईया, अंशुमन रुईया, अमित बजाज, कौस्तुभ धवसे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘मालवाहतूक करणाऱ्या ट्रकद्वारे मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असल्याने सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात इलेक्ट्रिक ट्रकची आवश्यकता होती. या क्षेत्रात ब्ल्यू एनर्जीने उत्तम काम करून ‘मेड इन इंडिया’ ट्रकची निर्मिती केली आहे. ही बाब देशाचे ‘मेक इन इंडिया’चे स्वप्न साकार करण्यासारखी आहे. इलेक्ट्रिक ट्रकसाठी संपूर्ण क्लिष्ट अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची संकल्पना आणि निर्मिती, तंत्रज्ञान देशातच त्यातही महाराष्ट्र आणि पुण्यात निर्माण होणे, ही अभिमानाची बाब आहे.

महाराष्ट्र शासनाने ई-वाहन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण, तसेच पर्यायी इंधन धोरण अशी शाश्वत धोरणे स्वीकारली आहेत. या क्षेत्रातील उद्योगाला त्याचा फायदा व्हावा आणि पर्यावरणाचे या माध्यमातून रक्षण व्हावे हे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र शासन मुंबई-पुणे इलेक्ट्रिक कॉरिडॉरसाठी, तसेच अन्यत्रही बॅटरी स्वॅपिंग (अदलाबदल) आणि चार्जिंगच्या कॉरिडॉरसाठी ब्ल्यू एनर्जीसोबत काम करेल. या ट्रकच्या किमती डिझेल वाहनांशी स्पर्धा करणाऱ्या असल्याने या वाहनांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

दावोस कराराचे फलित

दावोस येथे जानेवारीत झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत ब्ल्यू एनर्जी कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला होता. त्या करारानुसार ब्लू एनर्जी कंपनीचा प्रकल्प आज सुरू होत आहे. दावोस येथे झालेले करार प्रत्यक्षात येत आहेत.

कंपनीकडून पहिल्या टप्प्यात १० हजार ट्रक तयार होत आहेत. थोड्याच दिवसांत हा आकडा वाढत जाणार आहे. महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचे पहिल्या पसंतीचे राज्य आहे. ब्ल्यू एनर्जी कंपनीचा प्रकल्प सुरू होऊन उत्पादन सुरू झाले असून, रोजगारनिर्मिती झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधोरेखित केले.

मुख्यमंत्र्यांनी चालवला ट्रक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रसंगी इलेक्ट्रिक ट्रक कंपनीच्या आवारात चालविला. नवे तंत्रज्ञान समजून घेताना ते हाताळण्याचे कसबही त्यांनी दाखवून दिले. या वेळी कंपनीच्या मुंबई–पुणे इलेक्ट्रिक कॉरिडॉरचे उद्घाटनही करण्यात आले.