पुणे : भारतीय सैन्यात भरती होऊन सेवा देण्यास इच्छुक उमेदवारांना आता संधी मिळणार आहे. राज्यातील उमेदवारांसाठी अग्निवीर आणि नियमित संवर्गासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी लष्कर भरती रॅली होणार असून, पहिल्या टप्प्यात पुण्यात ९ ते १९ ऑगस्ट, तर नागपूर येथे ३ ते १३ सप्टेंबर दरम्यान रॅली आयोजित केल्या जाणार आहेत.
संरक्षण विभागातर्फे ही माहिती देण्यात आली. जुलै २०२५मध्ये झालेल्या समायिक प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची या दोन रॅलींमध्ये शारीरिक तंदुरुस्ती आणि वैद्यकीय तंदुरुस्ती तपासणी केली जाणार आहे. त्यांनी Join Indian Army या संकेतस्थळावर नोंदणी करताना दिलेल्या ई-मेलवर रॅलीचे प्रवेशपत्र पाठवले गेले आहे. तसेच या संकेतस्थळाद्वारेही उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र प्राप्त करून घेता येणार आहे. त्यामध्ये काही अडचण आल्यास पुणे कॅम्प आणि कामठी कॅम्प येथील संबंधित भरती कार्यालये उमेदवारांना या प्रक्रियेत मदत करतील, असे स्पष्ट करण्यात आले.
पुण्यातील भरती रॅली पुणे भरती कार्यालयाद्वारे बॉम्बे इंजिनीअर ग्रुप आणि सेंटर, दिघी, पुणे येथील ट्रेनिंग बटालियन-२ येथे आयोजित केली जात आहे. पुण्यात होणाऱ्या रॅलीमध्ये पुणे, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव (उस्मानाबाद) आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. नागपुरातील भरती रॅली नागपूर लष्कर भरती कार्यालयाद्वारे अल्बर्ट एक्का स्टेडियम, गार्ड्स रेजिमेंटल सेंटर, कामठी येथे आयोजित केली जाणार आहे. या रॅलीमध्ये नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पुणे जिल्हा प्रशासन आणि स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांनी पुणे येथील भरती रॅलीच्या यशस्वी आयोजनासाठी पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. सुमारे ५ हजार उमेदवार या भरती रॅलीत सहभागी होण्याची शक्यता आहे. रॅलीच्या आयोजनात १.६ किमी धावणे, शारीरिक तंदुरुस्ती चाचण्या, शारीरिक मोजमाप चाचण्या आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश असेल. वैद्यकीय तपासणीसाठी पुणे येथे सैन्य डॉक्टरांचा एक विशेष गट देखील तैनात केला जाणार आहे. मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलेली सर्व संबंधित कागदपत्रे उमेदवारांनी सोबत असण्याबाबत आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे.