CDS Anil Chauhan / पुणे : ‘रिव्हेली टू रिट्रीट’ हे पुस्तक केवळ आत्मचरित्र नाही, तर ते नेतृत्व, धोरण आणि सेवाभावाचे चिंतन आहे. हे पुस्तक भूतकाळातील निर्णयांचा अभ्यास, त्यांचे प्रामाणिक मूल्यमापन करतानाच पुढील पिढ्यांसाठी शिकवणही देते,’ असे मत संरक्षण दलप्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केले.
‘पूर्वीच्या काळात हवाई दलाचा वापर तणाव वाढवणारा असल्याचे मानले गेले. मात्र, आज तशी परिस्थिती राहिलेली नाही, हे ‘ऑपरेशन सिंदूर’मधून दिसून येते,’ असेही चौहान यांनी सांगितले.
‘थोरात यांनी केवळ भारतातच नाही, तर परदेशातही काम केले. कोरियन युद्धानंतर कस्टोडियन फोर्सचे नेतृत्व केले. कोरिया आजजगातील सर्वाधिक संवेदनशील ठिकाणांपैकी एक आहे. आता तर उत्तर कोरिया अण्वस्त्रधारी देश झाल्याने धोका अधिकच वाढला आहे. भौगोलिक आणि भूराजकीय परिस्थिती बदलल्याने थोरात यांच्या ‘फॉरवर्ड पॉलिसी’चे आज विश्लेषण करणे कठीण आहे. मात्र, लडाख आणि नेफा येथे समान पद्धतीने ‘फॉरवर्ड पॉलिसी’ लागू करणे चुकीचे ठरले,’ असे चौहान म्हणाले.
‘थोरात हे भारतीय सैन्याच्या उत्तम परंपरेचे उदाहरण होते. स्वातंत्र्यापूर्वीचे भारतीय सैन्य आणि नव्याने निर्माण होणारे स्वतंत्र भारताचे सैन्य या दोन पिढ्यांतील ते दुवा होते. स्वतंत्र भारताचे सैन्य उभारणे हे दूरदृष्टी आणि जुळवून घेण्याच्या क्षमतेची कसोटी पाहणारे होते. १९५७ पासूनच चीनकडून येणाऱ्या संकटाचा त्यांना अंदाज असल्याने त्यांनी १९६०मध्ये युद्धसराव केले.
चीनकडून हल्ला होण्याचा त्यांचा इशारा अचूक ठरला. जवानांची काळजी घेणे, त्यांचे कल्याण, प्रशिक्षण आणि मनोबल उंचावणे हाच अधिकाऱ्याचा प्रमुख धर्म आहे. त्यांच्या जीवनातून दूरदृष्टी आणि नैतिक बळ याचे महत्त्व कळते. त्यामुळे थोरात यांचे अनेक वर्षे उपलब्ध नसलेले पुस्तक पुन्हा उपलब्ध होत आहे, ही महत्त्वाची बाब आहे. त्यांचे आत्मचरित्र हे केवळ एका सैनिकाचे जीवनचरित्र नाही, तर नेतृत्वाचा धडा आहे,’ असे लेफ्टनंट जनरल सेठ यांनी नमूद केले.
तर ‘१९६२च्या युद्धाची सावली भविष्यातील सैन्यविकास, क्षमतावर्धन आणि सामर्थ्यनिर्मितीची प्रेरणा ठरली. गेल्या १५-२० वर्षांत उत्तरेकडील शत्रू पुरेसा परावृत्त झाला आहे. पूर्वी आखलेल्या योजनांचा पाया आज अधिक मजबूत होत आहे,’ असे अनिंद्य सेनगुप्ता यांनी सांगितले.
‘चीन युद्धात हवाई दलाचा वापर झाला असता, तर…’
‘१९६२मध्ये हवाई दलाचा वापर झाला असता, तर चिनी आक्रमणाचा वेग मंदावला असता, कदाचित थांबवलाही गेला असता. त्या वेळी भौगोलिक परिस्थिती भारतासाठी अनुकूल होती,’ असे जनरल चौहान यांनी नमूद केले.