पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर बनावट नावाने ओळख वाढवून महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल ३ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर ठगाला पुणे सायबर पोलिसांनी मुंबई विमानतळावर अटक केली. अभिषेक शरदचंद्र शुक्ला (वय ४२, मूळ लखनऊ, सध्या वास्तव्य पर्थ, ऑस्ट्रेलिया) असे अटक केलेल्या ठगाचे नाव असून त्याने खराडी भागात राहणाऱ्या महिलेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

आरोपी शुक्लाने विवाहविषयक संकेतस्थळावर ऑस्ट्रेलियन नागरिक, डॉ. रोहित ओबेरॉय अशा बनावट नावाने स्वत:ची माहिती दिली होती. त्याने २०२३ मध्ये फिर्यादी महिलेसोबत ओळख वाढवली. लग्नाचे आमिष दाखवत त्याने महिलेला जाळ्यात ओढले. दोघेजण काही दिवस एकत्र राहत होते. दरम्यान, महिलेला पहिल्या पतीकडून पाच कोटी रुपयांची पोटगी मिळाल्याचे ध्यानात आल्यावर आरोपी शुक्लाने तिचा विश्वास संपादित केला. व्यवसायात गुंतवणूक करण्याची सबब सांगून त्याने ३ कोटी ६० लाख रुपये उकळले.

इव्हॉन हँदयानी आणि विन्सेंट कुआण नावाच्या साथीदारांची ओळख करून देत आरोपीने फिर्यादी महिलेला सिंगापूरच्या बँकेत रक्कम भरण्यास भाग पाडले. आरोपीचा साथीदार विन्सेंट याने सप्टेंबर २०२४ मध्ये महिलेला ‘डॉ. ओबेरॉय मरण पावले’ असे ई-मेलद्वारे सांगितले. त्यावरून संशय आल्याने फिर्यादीने माहिती घेतली असता फसवणूक झाल्याचे ध्यानात आले. त्यानंतर महिलेने तातडीने पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करीत आरोपीचे खरे नाव अभिषेक शरदचंद्र शुक्ला असल्याचे उघडकीस आणले. लुकआउट नोटीस जारी केल्यानंतर २५ जून २०२५ रोजी तो सिंगापूरहून मुंबईमध्ये आल्यानंतर त्याला विमानतळावर अटक केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाचे उपनिरीक्षक सुशील डमरे, बाळासाहेब चव्हाण, संदीप मुंढे, नवनाथ कोंडे, संदीप पवार, संदीप यादव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

तीन हजार १९४ महिलांशी संपर्क

विवाहविषयक संकेतस्थळाद्वारे आरोपीने तब्बल ३ हजार १९४ महिलांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे आणखी किती महिलांची फसवणूक झाली आहे, याचा तपास पुणे सायबर पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, विवाह प्रोफाईल क्रमांकाच्या ( SH87341231) या व्यक्तीकडून फसवणूक झाली असल्यास सायबर पोलिसांशी ७०५८७१९३७१ किंवा ७०५८७१९३७५ या क्रमांकावर संपर्क करावा. विवाहविषयक संकेतस्थळावर ओळख वाढवताना सतर्क राहा. शहानिशा केल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नका. ‘कस्टमने पकडले’ म्हणून कोणी पैसे मागितल्यास रक्कम वर्ग करू नका, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विवाहविषयक संकेतस्थळाद्वारे महिलेसोबत ओळख वाढवून लग्नाच्या आमिषाने आरोपीने साडेतीन कोटींहून अधिक रक्कम स्वतःकडे घेत फसवणूक केली होती. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून, आणखी अशाच प्रकारे त्याने अनेक महिलांशी संपर्क साधला असल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार सायबर पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे. – पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे.