पुणे : ‘आपल्याला आवडणारी कलाकृती दुसऱ्याला आवडेलच असे नाही. प्रेक्षकांना आवडते ते सगळे चांगले असतेच असे नाही, असा सगळा विचित्र प्रकार आहे. पण, दिग्दर्शक, कलाकार आणि प्रेक्षक अशा सर्वांनाच आवडणारा ‘लगे रहो मुन्नाभाई’ हा एकमेव चित्रपट असावा. त्यामध्ये गांधींची भूमिका करणारा कोण होता हे आता आठवत नाही. पण, त्याची भूमिका ‘गांधी‘मधील बेन किंग्जले यांच्यापेक्षाही चांगली झाली,’ अशी दिलखुलास दाद देत ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांनी चक्क त्यांची मुलाखत घेणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची ‘गुगली‘ घेतली. तेव्हा बालगंधर्व रंगमंदिरातील प्रेक्षकांना आपण ‘पुलोत्सव’मध्ये असल्याची खात्री पटली.
पुलंचा २५ वा स्मृतिदिन आणि सुनीताबाईंच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून आयोजित ‘ग्लोबल पुलोत्सवा’च्या समारोप कार्यक्रमात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे (एनएफडीसी) संचालक प्रकाश मगदूम यांच्या हस्ते सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. दिलीप प्रभावळकर यांनी सई परांजपे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. महोत्सवाचे स्वागताध्यक्ष कृष्णकुमार गोयल, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव आणि सतीश जकातदार आणि प्रथमेश कन्स्ट्रक्शनचे कार्यकारी संचालक चैतन्य कुलकर्णी या वेळी उपस्थित होते.
परांजपे म्हणाल्या, ‘आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या ‘बालोद्यान’मधील ‘पक्ष्यांचे कविसंमेलन’ या श्रुतिकेनंतर पुलंचे पत्र आले होते. हा पुलंच्या नावाचा मला मिळालेला पहिला पुरस्कार. पुढे दूरदर्शनचा स्टुडिओ पुलंनी मला दाखविला होता. पुलंच्या भेटयात्रेमुळे मला दूरदर्शनचे समीप दर्शन झाले. गुणी, जागरूक तरुणांना ते प्रोत्साहन देत. दलित वाङ्मयाला पहिली सलामी पुलंनी दिली. त्यांचा विनोद बोचरा नाही तर, बोलका होता. आज मिळालेल्या या पुरस्काराने ‘साखरेचे खाणार त्याला पुलं देणार,’ अशी माझी अवस्था झाली आहे.
‘सगळ्या माध्यमांवर केलेले प्रेम आणि त्यामध्ये केलेला संचार हे पु. ल. आणि आमच्यातील साम्यस्थळ आहे. मराठीवरचे अतिरेकी प्रेम, खाण्याची आवड, चार्ली चॅप्लिन आणि बालगंधर्व हे आमचे आदर्श आहेत,’ असे सांगून परांजपे म्हणाल्या, ‘पुलंच्या ‘वयम् मोठम् खोटम्’ या नाटकामध्ये मी काम केले. दिल्लीमध्ये असताना ‘विठ्ठल तो आला आला’ हे नाटक हिंदीत केले. प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशनच्या (पीडीए) भालबा केळकर दिग्दर्शित ‘सारं कसं शांत शांत’ या नाटकात भूमिका केली. पण, पुलंची सगळी नाटके वाचली आहेत.’
‘नाटक आणि चित्रपटातून मी माणुसकीला महत्त्व देते. स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘चकाचक’ आणि साक्षरता प्रचार हा विषय ‘अंगुठाछाप’मधून हाताळला. आपल्याला जे सांगायचे त्यासाठी झेंडे, पताका फडकवायच्या, आरोळ्या द्यायच्या हे पटत नाही. कर्णा घेऊन सक्रियता दाखवण्याची गरज नाही,’ याकडे लक्ष वेधून परांजपे म्हणाल्या, ‘माणसे वाचून मी त्यांच्या कथा मनामध्ये गुंफते. माझ्या मनातील गजबजलेली माणसे नाटक, चित्रपटातून बाहेर येतात.’