दत्ता जाधव 

पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळासह सध्या जगभरात पाच चक्रीवादळे सक्रिय आहेत आणि आणखी दोन तयार होण्याची प्रक्रिया सुरू आहे. पण, या चक्रीवादळांचा कोणताही थेट परिणाम भारतीय उपखंडावर होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

अरबी समुद्रात तयार झालेले तेज चक्रीवादळ ओमान आणि येमेनच्या किनाऱ्याकडे झेपावत आहे. दुसरे चक्रीवादळ ऑस्ट्रोलियाच्या पूर्व समुद्रात आणि न्यूझीलंडच्या उत्तर समुद्रात तयार झाले आहे. तिसरे चक्रीवादळ मेक्सिकोच्या किनारपट्टीवर तयार झाले आहे. चौथे ग्वाटेमालाच्या किनारपट्टीवर आणि पाचवे चक्रीवादळ दक्षिण आफ्रिकेच्या उत्तर किनारपट्टीवर घोंगावत आहे. आफ्रिकेच्या उत्तर किनारपट्टीवर आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्याचे रुपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले आणि बांगलादेशाच्या दिशेने झेपावत असलेल्या ठळक कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. सुदैवाने या चक्रीवादळांचा भारतावर किंवा भारतीय उपखंडावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही.

हेही वाचा >>>पिंपरी : आता मेट्रोची धाव निगडीपर्यंत, शहरवासीयांचे स्वप्न होणार पूर्ण

मुंबईसह किनारपट्टीवर ऑक्टोबर हिटच्या झळा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यभरात मागील दोन दिवसांपासून पारा काहिसा उतरला असतानाच मुंबईसह किनारपट्टीवर मात्र तापमान चढेच राहिले आहे. सोमवारी मुंबईत सातांक्रुज येथे ३५.७ आणि कुलाब्यात ३३.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. किनारपट्टीवर रत्नागिरीत ३५.३, हर्णेत ३४.७ आणि डहाणूत पारा ३३.२ अंशांवर होता. विदर्भात अकोल्यात ३५.१ अंश सेल्सिअसची नोंद वगळता अन्य ठिकाणी पारा सरासरी ३४ अंशांवर राहिला. मराठवाड्यात सरासरी तापमान ३४ अंश सेल्सिअस राहिले. मध्य महाराष्ट्रातील सोलापुरात सोमवारी सर्वाधिक ३६.० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. अन्य ठिकाणी पारा सरासरी ३३.५ अंशांवर राहिला.