पुणे : ज्येष्ठ सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, ‘आयुका’चे माजी संचालक डॉ. नरेश दधिच (वय ८१) यांचे चीनमधील बीजिंग येथे निधन झाले. एका परिषदेसाठी बीजिंगला गेले असताना तेथेच त्यांची प्रकृती खालावली. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात १ सप्टेंबर १९४४ रोजी जन्म झालेले डॉ. दधिच यांनी पिलानी, हिसार आणि वल्लभ-विद्यानगर येथे शिक्षण घेतले. त्यांनी तत्कालीन पुणे विद्यापीठात प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ प्रा. विष्णू वासुदेव नारळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सामान्य सापेक्षता’ या विषयात पीएचडी प्राप्त केली. त्यानंतर विद्यापीठातच डॉ. दधिच यांनी गणिताचे अध्यापन केले.

सन १९८८ मध्ये डॉ. जयंत नारळीकर यांच्यासह आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्राच्या (आयुका) स्थापनेत त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. २००३ ते २००९ या काळात ‘आयुका’चे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले. ‘आयुका’तील निवृत्तीनंतर अनेक विद्यापीठांत सन्माननीय संशोधन प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते.

गुरुत्वशास्त्र आणि सापेक्षता सिद्धांताबाबतच्या अभ्यासामध्ये डॉ. दधिच यांचे नाव राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतले जाते. आइन्स्टाइन यांच्या सामान्य सापेक्षतावादाच्या सिद्धांताचा खगोलभौतिकी क्षेत्रात उपयोग, कृष्णविवर, ऊर्जाविज्ञान अशा विषयांवर त्यांनी सखोल संशोधन केले. त्यांचे दोनशेहून अधिक शोधनिबंध मान्यवर संशोधनपत्रिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. तसेच, अनेक पुस्तकांसाठी त्यांनी लेखन, संपादनही केले.

प्रेरणादायी कार्य

‘मी विद्यार्थी असताना ‘ज्योतिर्विद्या परिसंस्था’ या संस्थेत सक्रिय होतो. ‘आयुका’ सुरू झाल्यावर डॉ. नरेश दधिच यांना ज्योतिर्विद्या परिसंस्थेचे अध्यक्ष होण्याची विनंती केली होती. त्याला त्यांनी मान्यता देऊन अध्यक्ष म्हणून काम केले होते. ‘आयुका’च्या सुरुवातीच्या काळात डॉ. जयंत नारळीकर, डॉ. नरेश दधिच हे दोघेच काम करत होते. डॉ. दधिच अधिष्ठाता होते.

विज्ञान प्रसार, कार्यशाळा आयोजनाचे काम त्यांच्याकडे होते. ‘आयुका’च्या जडणघडणीत त्यांनी अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले. डॉ. दधिच ‘आयुका’चे संचालक असताना ‘आयुका’त काम करण्याचीही संधी मिळाली,’ अशी आठवण खगोलशास्त्रज्ञ डॉ. योगेश वाडदेकर यांनी सांगितली.

ते म्हणाले, ‘डॉ. दधिच अत्यंत सकारात्मक, सर्वांना सोबत घेऊन काम करणारे होते. निवृत्तीनंतरही त्यांचे संशोधन सुरू होते. व्यापक सापेक्षतावादासारख्या अत्यंत गहन विषयात त्यांचे संशोधन होते. सापेक्षतावादाच्या अभ्यासासाठी गणिताचा पाया भक्कम असावा लागतो. तो डॉ. दधिच यांचा होता. राजस्थानातील छोट्या गावातून येऊन त्यांनी केलेले संशोधन, ‘आयुका’सारख्या संस्था उभारणीत दिलेले योगदान प्रेरणादायी आहे.’