दत्ता जाधव, लोकसत्ता

पुणे : वाढत्या शहरीकरणामुळे बदलापुरातील प्रसिद्ध जाभळांच्या झाडांवर कुऱ्हाड चालवली जात होती. पण, जनजागृतीमुळे काळा राघू म्हणून परिचित असलेल्या या जांभळांना चांगले दिवस येणार आहेत. बदलापूरच्या जांभळांना भौगोलिक मानाकंन मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. वन विभाग २५ एकरांवर जांभूळ लागवड करणार आहे, तर खादी ग्रामोउद्योग महामंडळाने मध निर्मिती आणि खरेदीसाठी पुढाकार घेतला आहे.

बदलापुरात जांभूळ संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या जांभूळ परिसवंर्धन आणि समुदाय विकास चॅरिटेबल ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आदित्य गोळे म्हणाले, बदलापूरची जांभळे टपोरी, वेगळ्या चवीची आहेत. त्यामुळे भौगौलिक मानांकनासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. आता ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. १८८२ ठाणे जिल्हा गॅझेट लिहिले गेले त्यात बदलापुरात जांभळाची बाजारपेठ होती, असा उल्लेख आहे. १९३४ मध्ये न्यायाधीश, इतिहास संशोधक आणि साहित्यिक नारायण गोविंद चापेकर यांनी आमचा गाव बदलापूर हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात चैत्र, वैशाख आणि ज्येष्ठ महिन्यात बदलापुरात जांभळांची विक्री होत होती, असा उल्लेख आहे. या दोन उल्लेखांमुळे भौगोलिक मानांकनाच्या प्रक्रियेला गती आली आहे.

आणखी वाचा-पुणे : मासळीप्रेमींच्या खिशावर ताण

चामटोलीत २५ एकरांवर जांभूळ लागवड

बदलापुरात एकूण नऊ हजार हेक्टर वन जमीन आहे. त्यातील २५ एकरावर स्थानिक देशी जांभळांच्या झाडांची लागवड केली जाणार आहे. वन विभाग, स्थानिक नागरिक, आदिवासी आणि स्वयंसेवी संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून ही झाडांची लागवड केली जाणार आहे. स्थानिकांमध्ये जागृती करून वाढत्या शहरीकरणामुळे जांभळांच्या झाडांची होणारी तोडही थांबविण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आदित्य गोळे यांनी दिली.

पुढील हंगामापासून जांभूळ मध निर्मिती

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोउद्योग महामंडळाच्या वतीने बदलापुरात मध निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. २९ मे रोजी भेट देऊन आमदार किसन कथोरे, स्थानिक शेतकरी आणि स्वयंसेवी संस्थांची एकत्रित बैठक घेतली आहे. पुढील टप्प्यात शेतकरी, मधपाळ आण आदिवासी लोकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. जांभळाच्या पुढील हंगामात मध निर्मिती करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी पुढील वर्षभर प्रशिक्षण, मध पेट्यांचे वाटप, मध संकलन केंद्र आदी सुविधा उभारल्या जाणार आहेत. बदलापूर मध निर्मिती करणारे गाव म्हणून विकसित करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष रवींद्र साठे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिन्याभरात जीआय मानाकंन

बदलापूरच्या जांभळांना भौगोलिक मानांकन मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. परिक्षण समितीचा अहवाल सकारात्मक आला आहे. साधारण महिनाभरात भौगोलिक मानांकन मिळाल्याची अधिकृत घोषणा होऊ शकेल, अशी माहिती भौगोलिक मानांकन तज्ज्ञ अॅड. गणेश हिंगमिरे यांनी दिली.