लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सुरू केलेली जन सन्मान यात्रा आज (गुरुवार, १५ ऑगस्ट) अजित पवार यांच्या पुण्यातील बालेकिल्ल्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील वडगाव शेरी आणि हडपसर विधानसभा मतदारसंघात यानिमित्ताने विविध कार्यक्रम होणार असून, या यात्रेच्या माध्यमातून समजातील विविध घटकांशी अजित पवार हे संवाद साधणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नारायण पेठेतील पक्ष कार्यालयातून संविधानाचे वाचन करून यात्रेला सकाळी दहा वाजता प्रारंभ होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यावेळी उपस्थित राहणार आहेत. सारसबागेतील गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघात माजी सैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. लोहगाव येथील गजानन मंगल कार्यालय येथे हा मेळावा होईल. त्यानंतर विमाननगर येथे गृहनिर्माण सोसायट्या आणि स्वयंसेवी, सामाजिका संघटनांच्या पदाधिकारी-प्रतिनिधींची बैठक अजित पवार यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता होईल.

आणखी वाचा-स्टेट बँकेचे लाखो कोटींच्या कर्जावर पाणी! बड्या थकबाकीदारांकडून केवळ १२ टक्के वसुली

हडपसर विधानसभा मतदारसंघात सायंकाळी सव्वाचार वाजता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत महिला मेळावा वानवडी येथील महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथे होणार आहे. त्यानंतर हडपसर येथील कन्यादान मंगल कार्यालयात बांधकाम क्षेत्रातील कामगारांबरोबर अजित पवार संवाद साधतील आणि सायंकाळी सात वाजता महायुतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांनी महायुतीबरोबर लोकसभा निवडणूक लढविली. मात्र लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. निवडणुकीसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात विविध लोकप्रिय योजनांची घोषणा करण्यात आली आहे. तसेच ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जन सन्मान यात्रा आयोजित करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून या यात्रेला गेल्या आठवड्यात प्रारंभ करण्यात आला. या यात्रेच्या निमित्ताने कार्यक्रमाचे स्वरूपही बदलण्यात आले आहे. यात्रातील गुलाबी रंगावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधकांनी टीका सुरू केली आहे.

आणखी वाचा-पिंपरी : राष्ट्रवादीने चिंचवडवर दावा केल्यानंतर आता भाजपचा ‘या’ मतदारसंघावर दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शहर आणि जिल्ह्यातील अनेक आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. अजित पवार यांच्या या यात्रेच्या बदलेल्या स्वरूपावरून विरोधकांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरूर, बारामती येथील त्यांच्या शिव स्वराज्य यात्रेवेळी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे या यात्रेवेळी अजित पवार विरोधकांच्या टीकेला उत्तर देणार का, याबाबतही पदाधिकाऱ्यांना उत्सुकता आहे.