पुणे : ‘संवादाचा पूल असलेल्या भाषेतून रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असल्याने भारतामध्ये जपानी शिकणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे,’ असे मत जपानचे मुंबईतील वाणिज्यिक राजदूत यागी कोजी यांनी शनिवारी व्यक्त केले.
‘भारत आणि जपान यांच्यातील संबंध चांगले असून, भाषेद्वारे व्यापार आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत,’ असेही त्यांनी सांगितले. जपानी भाषेच्या अभ्यासक स्नेहा असईकर संपादित आणि ‘मी शिकेन’ प्रकाशित ‘काकेहाशि’ या जपानी-मराठी- इंग्रजी शब्दकोशाच्या प्रकाशन कार्यक्रमात कोजी बोलत होते. जपान फाउंडेशनचे पश्चिम भारत जपानी भाषेचे सल्लागार तोमोनारी कुरोदा, जॅपनीज लँग्वेज टीचर्स असोसिएशनचे संचालक डॉ. हरी दामले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. मानसी शिरगुरकर, जॅपनीज लँग्वेज टीचर्स स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष सुहास आदी या वेळी उपस्थित होते.
कोजी म्हणाले, ‘जपानी भाषेविषयी आकर्षण असून, भारतामध्ये गेल्या काही वर्षांपासून जपानी भाषा शिकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. २०२१ मध्ये ३६ हजार विद्यार्थी जपानी भाषेचे शिक्षण घेत होते. आता ही संख्या ५६ हजारांपर्यंत पोहोचली आहे. दोन्ही देश भाषा शिक्षणाला प्रोत्साहन देत असल्याने भविष्यात हा आकडा वाढणार आहे. ‘काकेहाशि’ याचा अर्थ दुवा असा आहे. त्यामुळे हा शब्दकोश दोन्ही देशांना जोडणार आहे.’
मराठी आणि जपानी या दोन्ही भाषांचे व्याकरण, उच्चार काही प्रमाणात समान असल्याने मराठीतून जपानी शिकणे सोपे आहे. त्यामुळे जपानी शिकणाऱ्यांसाठी ‘काकेहाशि’ हा शब्दकोश अनमोल भेट ठरणार आहे. ‘काकेहाशि’प्रमाणे आता मराठी-जपानी शब्दकोशाचीदेखील निर्मिती व्हावी. भाषेमुळे दोन्ही देशांतील माणसे आणि संस्कृती जोडली जात आहे. – यागी कोजी, जपानचे मुंबईतील वाणिज्यिक राजदूत