पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला पाठिंबा का दिला, असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास नसल्यानेच भाजपला अन्य पक्षांची मदत घेत निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारांशी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली.

हेही वाचा >>>गुप्त पद्धतीने आणि गनिमी काव्याने पार्थ पवारांचा प्रचार चालू : अजित पवार

‘भाजपकडे पुरेसे संख्याबळ आहे. मात्र त्यांना अन्य पक्षांची गरज का पडत आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. याचा अर्थ त्यांच्याकडे विजयी होण्याचा आत्मविश्वास नाही. त्यामुळे त्यांना अन्य पक्षांची मदत घ्यावी लागत आहे हे स्पष्ट होत आहे,’ असे पाटील यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासंदर्भात आणि वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या पत्राबाबतही पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले, की माढा लोकसभा मतदारसंघातील पक्षाचा उमेदवार जवळपास निश्चित झाला आहे. योग्य वेळी त्याचे नाव जाहीर केले जाईल. या मतदारसंघात राष्ट्रवादी किंवा मित्र पक्षाचा सक्षम उमेदवार दिला जाईल. महादेव जानकर आमच्या संपर्कात आहेत. महाविकास आघाडीत अन्य मित्र पक्ष सहभागी असल्याने स्वतंत्रपणे जागा घोषित करता येत नाहीत. आघाडीच्या जागावाटपात जी जागा मिळेल त्या जागेवर सक्षम उमेदवार दिला जाईल.

हेही वाचा >>>सहकार आयुक्त सौरभ राव यांचा जाता-जाता लेखापरीक्षकाला दणका

प्रकाश आंबेडकर यांनी दिलेले पत्र वाचले आहे. महाविकास आघाडीतील त्यांच्या समावेशाबाबत चर्चाही सुरू आहे. त्यामुळे त्याबाबत जास्त बोलता येणार नाही. विनाकारण जाहीर विधाने करणे योग्य नाही, असेही त्यांनी सांगितले.

आमदार लंकेंच्या प्रवेशाबाबत सूचक विधान

आमदार नीलेश लंके नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहिल्यास शंभर टक्के निवडून येतील. त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र लंके यांना तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत, याची दक्षता घ्यावी लागेल. योग्य वेळी सर्व सोपस्कार पूर्ण केले जातील. नगर दक्षिणमध्ये पक्षाची तुतारी निश्चित वाजेल, असेही पाटील यांनी सांगितले.