पुणे : ‘क्रांती हवी असेल, तर केवळ बुद्धिप्रामाण्य विचार पाहिजे, असे सांगितले जाते. संत कबीर, गुरू नानक, संत तुकाराम यांना भक्त म्हणतो. पण, ते खरे क्रांतिकारी होते. देशातील सगळेच कसे देवभोळे आहेत व त्यांच्या सगळ्याच धारणा कशा चुकीच्या आहेत आणि आमचेच कसे बरोबर आहे, अशा हट्टाने बदल करता येत नाही. समाजाच्या सगळ्या सांस्कृतिक-धार्मिक परंपरा नाकारल्याने नुकसान होते. ‘धर्मविरोधी’ शिक्क्याने देशातील डाव्या चळवळींचेही मोठे नुकसान झाले आहे,’ असे मत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील समाजशास्त्राचे प्रा. सुरिंदर जोधका यांनी रविवारी व्यक्त केले.

‘आर्ष पब्लिकेशन्स’आणि ‘गेल लेगसी ग्रुप’च्या वतीने ‘गेल ऑमव्हेट’ यांच्या संग्राह्य साहित्यातील ‘तुकोबा टू प्रति सरकार : द फाऊंडेशन ऑफ बुर्जुआ स्टेट इन इंडिया’ या दुसऱ्या भागाच्या प्रकाशन कार्यक्रमात जोधका बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, सामाजिक कार्यकर्त्या लता भिसे-सोनवणे, सुरेंद्र जोंधळे, प्रकाशक दिलीप चव्हाण या वेळी उपस्थित होते.

‘ठरावीक काळानंतर चळवळी प्रतिमापूजनात अडकून जातात. त्यामुळे काम करणे अवघड होते. हा विरोधाभास डाव्या चळवळीतही दिसतो. महापुरुषांची निर्मिती झाली, की नवे प्रश्नही निर्माण होतात. तिथे स्त्रियांना स्थान राहत नाही. महात्मा फुले यांच्या कामात टोकाच्या धारणा नव्हत्या. त्यांनी सर्वसमावेशक दृष्टीने इथले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले,’ असे जोधका यांनी सांगितले.

जोधका म्हणाले, ‘भारतीय संस्कृती, समाज ही कोणतीही एक गोष्ट नाही. त्यात अनेक प्रवाह आहेत. प्रत्येक भागांत अन्न, वस्त्र, निवारा यांसह विवाह, परंपरा यांमध्ये विविधता दिसते. मुळात संस्कृती हीच सतत बदलणारी असते. त्यामुळे एकसांस्कृतिकवादाला नकार देणे गरजेचे आहे. जाती व्यवस्थेचा वर्ग निर्मितीची प्रक्रिया म्हणून विचार करणे गरजेचे आहे.’

‘गेलने व्यवहारातून सिद्धांताकडे जाणारी मांडणी केली. तिच्या संशोधन पद्धतीमुळे पर्यावरणीय प्रश्नांचाही स्त्रीमुक्ती, कष्टकऱ्यांची मुक्ती, वंचितांच्या न्यायाचा लढा अशा सर्वांगाने विचार करता येतो. स्त्रीप्रधान काळात होत असलेला विचार आज अमलात आणला नाही तर, स्त्रीमुक्तीचा विचारही करता येत नाही. ऐतिहासिक घटनांना आधुनिक पद्धतीने मांडण्याची गेलची ही दृष्टी संशोधनाच्या, व्यवहाराच्या आणि चळवळीच्या स्तरावरही अंगिकारली गेली पाहिजे,’ असे पाटणकर यांनी सांगितले. नागमणी राव यांनी सूत्रसंचालन केले.

‘सध्याची परिस्थिती गंभीर’

‘दोन पक्ष फोडून सरकार आणल्याची भाषा करणाऱ्यांकडे शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. मात्र, आमदार फोडण्यासाठी पन्नास-पन्नास कोटी आहेत. पैशांची उधळपट्टी करणाऱ्या सरकारने मजुरांचे कामाचे तास वाढविले. सध्या पैशासाठी रिक्षावाले, कष्टकरी-कामगारांना वेठीस धरले जाते. ही परिस्थिती गंभीर आहे. तळागाळातील माणसांमधील संवाद बंद पडला आहे,’ अशी खंत डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली. ‘समाजात धगधग आहे. या जागृतीला विचारांची जोड देण्याची गरज असून, ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद न करता सध्याच्या सामाजिक-राजकीय संदर्भात अभ्यासपूर्वक काम करायला हवे. मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,’ असेही त्यांनी सांगितले.