‘कैलास लोण्या’चे ‘कैलास जीवन’ होऊन आता साठ वर्षे उलटून गेली आहेत. या काळात ‘सात दिवसांत लख्ख गोरे बनवणारी’ किंवा ‘पायांच्या भेगा चुटकीसरशी घालवणारी’ अनेक ‘स्किन क्रीम’ बाजारात आली, पण कोणताही अचाट दावा न करताही कैलास जीवन टिकून राहिले. आपला आब राखून विस्तारले आणि आता ते रशिया, पोलंड आणि स्वित्र्झलडलाही पोहोचले आहे.

‘कैलास जीवन’ नामक ‘स्किन क्रीम’शी बहुसंख्य मराठीजनांचा संपर्क बालपणीच येतो. कुठेतरी खरचटून किंवा हात भाजून घेऊन आलेल्या नातवंडांना एखादी आजी आपल्या थरथरत्या हातांनी हळुवारपणे कैलास जीवन लावते आणि पिवळसर लोण्यासारख्या दिसणाऱ्या त्या क्रीमचा थंड स्पर्श आणि कापराचा वास त्या वेळी लक्षात राहतो तो कायमचा! कैलास जीवनला ‘स्किन क्रीम’ म्हणणेही कृत्रिम वाटावे इतके ते घरगुती होऊन गेले आहे.

या क्रीमचे पहिले नाव चक्क ‘कैलास लोणी’ असे होते! आंजल्र्याहून ‘व्हाया गोवा’ पुण्याला आलेल्या आणि इथेच वसलेल्या वासुदेव कोल्हटकर या धडपडय़ा पुणेकराचे ते संशोधन. त्या ‘कैलास लोण्या’चे ‘कैलास जीवन’ होऊन आता साठ वर्षे उलटून गेली आहेत. या काळात ‘सात दिवसात लख्ख गोरे बनवणारी’ किंवा ‘पायांच्या भेगा चुटकीसरशी घालवणारी’ अनेक स्किन क्रीम बाजारात आली, पण कोणताही अचाट दावा न करताही कैलास जीवन टिकून राहिले. आपला आब राखून विस्तारले आणि आता तर पार रशिया, पोलंड आणि स्वित्झरलँडलाही पोहोचले.

वासुदेव कोल्हटकर हे मूळचे शिक्षक, पण त्यांना कीर्तनाचा नाद होता. कीर्तनासाठी संस्कृत यायला हवे म्हणून त्यांनी सांगलीच्या संस्कृत विद्यालयात धडे घेतले आणि १९२३-२४ मध्ये पुण्यात स्थायिक झाले. आयुर्वेद आणि होमिओपॅथीची आवड त्यांना होतीच. त्यांनी स्वत:ची वेगळ्या पठडीतली कीर्तने सुरू केली. कीर्तनाच्या दोन भागांच्या मध्ये ते दहा मिनिटांचे मध्यंतर घेत आणि या मध्यंतरात काहीतरी सल्ला देणारी घोषणा करीत. या वेळी लोकांना काही साधी औषधे सांगता येऊ शकतील असे त्यांना वाटले आणि कैलास जीवनच्या कल्पनेचे बीज तिथे रुजले. या क्रीमची प्रेरणा आली आयुर्वेदातील ‘शतधौतघृत’ (विशिष्ट पद्धतीने शंभर वेळा घासलेले/ फेटलेले तूप) या औषधावरून. परंतु या तुपाला एक प्रकारचा उग्र वास येई. तशीच प्रक्रिया खोबरेल तेलावर करून पाहूया, या विचारातून कोल्हटकरांनी त्यात शंखजिरे पावडर (टाल्क पावडर), राळ, चंदनाचे तेल, कापूर असे विविध घटक घालून त्यापासून ‘कैलास लोणी’ बनवले. या उत्पादनाचे हे माजघरातील नाव फार दिवस राहिले नाही आणि ‘कैलास जीवन’ याच नावाने उत्पादन विकायचे ठरले.

जोडधंदा म्हणून १९५५-५६ मध्ये जन्मास आलेल्या या स्किन क्रीमचे आगळे ‘मार्केटिंग’ हे त्याचे आणखी एक वैशिष्टय़. पहिली जवळपास दहा वर्षे कीर्तनाच्या मध्यंतरात या क्रीमचे नाव आणि उपयोग जमलेल्या लोकांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न होत असे. राजा केळकर संग्रहालयाशेजारी असलेल्या कोल्हटकरांच्या घरातील अदिती वामन मंदिर, खुन्या मुरलीधराचे देऊळ, मोदी गणपती, सदाशिव पेठेत केसकर विठोबा, कँपातील मारुती मंदिर, शिवाजीनगरचा रोकडोबा अशी सगळीकडे त्यांची कीर्तने होत. या निमित्ताने समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना कैलास जीवन माहिती झाले. तारुण्यपिटिका, त्वचेच्या इतर तक्रारी, भाजणे, मूळव्याध अशा विविध गोष्टींवर चालणारे व औषध म्हणून पोटातही घेता येणाऱ्या या क्रीमची ६० ग्रॅमची बाटली तेव्हा एक रुपयाला मिळे. तोपर्यंत वासुदेव कोल्हटकरांची मुलेही शिक्षण पूर्ण होऊन हाताशी आली होती. त्यांच्या एका मुलाने आणि एका मुलीने वैद्यकीचे शिक्षण, तर एका मुलाने औषधनिर्माण शास्त्राचे शिक्षण घेतले होते. आणखी एक मुलगा एमए पूर्ण करून वडिलांना मदत करण्यास तयार झाला होता. असे सगळे घरच उद्योगासाठी एकत्र आले.

‘आयुर्वेद संशोधनालय पुणे प्रा. लि.’ या कंपनीतर्फे धायरीत कैलास जीवनचे उत्पादन होते. राम कोल्हटकर, परेश आणि वेधस कोल्हटकर आणि अनुराधा कोल्हटकर हे कंपनीचे आताचे संचालक. मधल्या काळात या क्रीममध्ये कालानुरूप बदल झाले. हे क्रीम ‘इमल्शन’ स्वरूपातील असल्यामुळे त्यात पाणीसदृश चुन्याची निवळी असते. क्रीम बाटलीत भरल्यावर त्यातून पाणी वेगळे होऊ नये यासाठी सुरुवातीच्या काळात विविध प्रयोग झाले. नंतर जाड काचेच्या बाटल्या आणि पत्र्याची झाकणेही बदलली गेली. ‘पॅकिंग’ बदलले पण उत्पादनाचे मूळ तेच राहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुण्याने कैलास जीवनला जिव्हाळा दिला हे मान्य करतानाच ‘आमची कुठेही शाखा नाही’चा पुणेरी बाणा मागे टाकून व्यावसायिक म्हणून मोठे होण्याचा प्रयत्नही कोल्हटकर कुटुंबीयांनी केला, हे विशेष. आपले उत्पादन विकत घ्यायला लोकांना थेट आपले घरच गाठावे लागणे बऱ्या व्यावसायिकाचे लक्षण नव्हे. उत्पादकाला व्यापाऱ्याला भले कमिशन द्यावे लागो, पण त्याच्यामार्फत उत्पादन लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हाच त्याचा अधिक प्रसार होईल, हे व्यवसायाचे साधे तत्त्व त्यांनी दूर लोटले नाही. कैलास जीवन परदेशी गेले ते इथल्यापेक्षा वेगळ्या वेष्टनात आणि वेगळ्या नावासह. व्यावसायिक म्हणून आम्हाला वाढायचे आहे, ही स्पष्ट भूमिका त्यांनी ठेवली. आपल्याला ज्या नवीन शहरात उत्पादन घेऊन जायचे आहे त्या शहराचा भूगोल पक्का माहीत हवा, तरच विपणन उत्तम करता येईल, ही अभ्यासू वृत्ती सोडली नाही, शिवाय उत्पादनाबद्दल अचाट दावेही केले नाहीत. इतर अनेक उत्पादनांपेक्षा कैलास जीवन वेगळे ठरले ते कदाचित त्याच्या विश्वासार्हतेमुळेच. पुणेकरांनी त्याला केव्हाच आपलेसे केले होते, पण पुण्याचा ‘ब्रँड’ म्हणून बाहेरच्या बाजारपेठेत गेलेले हे उत्पादन तिथेही स्थिरावले आणि त्याचा थंडावा देणारा स्पर्श आणि कापराचा वास अनेकांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या करू लागला.

sampada.sovani@expressindia.com