पुणे : महिलांचे दागिने हिसकावल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांत पोलिसांना तीन वर्षे गुंगारा देणाऱ्या चोरट्यांना खराडी पोलिसांनी अटक केली. चोरट्यांनी शहर परिसरात चार गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

फिदा मनुअली इराणी (वय ३५, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर), अली अब्बास फिरोज सय्यद (वय ३०, रा. इराणी वस्ती, अंबिवली, कल्याण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. खराडी भागात एका फळविक्रेत्याच्या गाडीवर फळे खरेदी करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. तांत्रिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी कारवाई करून इराणी आणि सय्यद यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांनी खराडी, अलंकार, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांच्या परिसरात दागिने हिसकाविण्याचे गुन्हे केल्याचे उघड झाले.

आरोपींकडून दुचाकी आणि सोन्याचे दागिने असा दोन लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी फिदा इराणी याच्याविरुद्ध खडकी, शिवाजीनगरसह वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे १७ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, फसवणूक, शस्त्र बाळगणे, वाहन चोरी, दागिने हिसकावणे अशा प्रकारचे गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. तो गेली साडेतीन वर्षे फरार होता. सय्यद याच्याविरुद्धही ठाणे आणि नवी मुंबई परिसरात १७ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल कोळपे, पोलीस कर्मचारी सुरेंद्र साबळे, अमित जाधव, श्रीकांत कोद्रे, वसिम सय्यद, सचिन रणदिवे आणि पथकाने ही कारवाई केली.