पाणीपुरी विक्रेत्याच्या मुलाचं अपहरण करून 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या तीन जणांना हिंजवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अपहरण झालेल्या 15 वर्षीय मुलाची सुखरूप सुटका करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. गंभीर बाब म्हणजे अपहरणाच्या कटात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीकडून तलवार, कोयता आणि पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. 

सनी शंकर कश्यप वय- 15 अस अपहरण होऊन सुखरूप सुटका झालेल्या मुलाच नाव आहे. या प्रकरणी त्याच्या आईने हिंजवडी पोलिसात अपहरण झाल्या प्रकरणी तक्रार दिली होती. लक्ष्मण नथुजी डोंगरे वय- 22, ज्ञानेश्वर सचिन चव्हाण वय- 22, लखन किसन चव्हाण वय- 26 यांना बेड्या ठोकण्यात आल्या असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. ज्ञानेश्वर चव्हाण हा मुख्य सूत्रधार असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर कश्यप हे पाणीपुरी विक्रेते आहेत. त्यांच्या तीन ठिकाणी पाणीपुरीचा गाडा लागलेला असतो. मुलगा सनी हा देखील त्यांच्या व्यवसायात हातभार लावतो. शनिवारी सनी हा पाणीपुरीचा गाडा घेऊन घरी येत होता तेव्हा त्याचं अज्ञात काही व्यक्तींनी शस्त्राचा धाक दाखवून अपहरण केलं होतं. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. काही तासांनी शंकर कश्यप यांना फोन आला, मुलगा जिवंत हवा असेल तर आम्हाला 20 लाखांची खंडणी द्या अशी धमकी देण्यात आली. घाबरलेल्या शंकर कश्यप यांनी पत्नीसह हिंजवडी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली.  घटनेचा गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दोन पथक तयार केली. आरोपींचा शोध सुरू झाला. 18 सीसीटीव्ही तपासून काही संशयित तरुण मारुती कार मधून गेल्याच दिसलं. दरम्यान, तांत्रिकदृष्ट्या तपास सुरू केला. शिक्रापूर परिसरात मलठण येथे तीच मारुती कार उभी असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांनी मिळाली. पोलीस पथक त्यांच्यापर्यंत पोहचले. पोलिसांनी वेषांतर करून आरोपीला घेरले. अपहरण झालेला सनी ला बाहेर काढण्यात आले. आरोपीकडून एक तलवार, कोयता आणि पाच मोबाईल जप्त करण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली  सागर काटे, गोमारे पोलीस कर्मचारी अरुण नरळे आणि कैलास केंगले यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.