भाजपाचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांच्यावर मागील काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रुग्णलयात जाऊन गिरीश बापटांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली. यानंतर शरद पवार आणि किरीट सोमय्या यांनीरुग्णालयाच्या आवारातील भिंतीवरील लता मंगेशकर यांच्या चित्रांची पाहणी केली.

गिरीश बापट यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी आणि शरद पवार यांनी गिरीश बापट यांची भेटी घेऊन तब्येतीची विचारपूस केली. शरद पवार ज्याप्रकारे गिरीश बापट यांच्या तब्येतीची आपुलकीने चौकशी करत होते, ते पाहून बरं वाटलं. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचं वेगळ स्थान आहे. सर्वच राजकारण्यांनी पवार यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आम्ही नेहमीच त्यांचा आदर करतो, अशी प्रतिक्रिया सोमय्यांनी दिली.

‘आजारातून लवकर बरे व्हा, आपण लवकरच संसदेत भेटू…’ असा सल्ला शरद पवार यांनी गिरीश बापटांना दिला. याबाबतची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. तुमच्या तिघांमध्ये काही राजकीय चर्चा झाली का? असं विचारलं असता सोमय्या म्हणाले, “ज्यावेळी आम्ही रुग्णालयात गेलो. तेव्हा बापटसाहेब पेरू खात होते. त्यामुळे आमच्या त्यावरच जास्त गप्पा झाल्या. शरद पवार यांच्याकडून सर्व राजकारण्यांना विशिष्ट गुण घेण्यासारखे आहेत. त्यापैकी मी देखील काही गुण घेतले आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोमय्या पुढे म्हणाले की, “शरद पवार यांनी अनेक चांगली कामं केली आहेत. आमचा पक्ष जरी वेगळा असला तरी शरद पवार हे गिरीश बापट यांना भेटण्यास आले. आपल्या देशाची आणि महाराष्ट्राची हीच तर खरी संस्कृती आहे,” असंही ते म्हणाले.