पुणे : करोना विषाणूच्या ओमिक्रोन प्रकाराच्या नवीन उपप्रकार केपी.२ चे रुग्ण राज्यात वाढू लागले आहेत. या उपप्रकाराचे राज्यात ९१ रुग्ण आढळले असून, त्यातील सर्वाधिक ५१ पुण्यातील आहेत. जेएन.१ उपप्रकाराच्या जागी आता केपी.२चा संसर्ग वाढू लागला आहे.

जगभरात जानेवारी महिन्यात केपी.२ आढळला. तेव्हापासून जेएन.१ उपप्रकाराला मागे टाकत केपी.२ ची रुग्णसंख्या वेगाने वाढत आहेत. आता राज्यात या उपप्रकारचे रुग्ण वाढले आहेत. राज्यात या उपप्रकाराचे एकूण ९१ रुग्ण आढळले आहेत. त्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ५० रुग्ण तर त्याखालोखाल ठाणे २०, अमरावती ७, छत्रपती संभाजीनगर ७, सोलापूर २, अहमदनगर, लातूर, नाशिक आणि सांगली प्रत्येकी १ अशी रुग्णसंख्या आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

हेही वाचा…निर्यातबंदी उठवल्यानंतरही कांदा कवडीमोलच? नेमकी कारणे काय?

केपी.१ हा जेएन.१ पासून तयार झालेला आहे. आधी महाराष्ट्रात जेएन.१ची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. यंदा राज्यात जेएन.१ चे १ हजार ४१६ रुग्ण आढळले आहेत. राज्यात करोनाचा मृत्यूदर १.८१ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के आहे. राज्यात या वर्षभरात करोनामुळे १७२ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील ७० टक्के रुग्ण ६० वर्षांवरील आहेत. याचबरोबर मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्ण सहव्याधी असलेले होते, असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

हेही वाचा…प्रचारखर्चाची माहिती लपवल्यामुळे एका उमेदवारावर गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेएन.१ च्या ऐवजी जगभरात सध्या केपी.२ चा संसर्ग वाढला आहे. हा उपप्रकार सौम्य स्वरूपाचा असून, त्यामुळे बाधित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची संख्या वाढलेली नाही. त्यामुळे चिंता करण्यासारखी परिस्थिती नाही, असे जनुकीय क्रमनिर्धारणाचे राज्य समन्वयक डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले.