scorecardresearch

मेट्रो प्रवाशांसाठी वाहनतळ सुविधेचा अभाव

मेट्रो प्रवाशांसाठी वाहनतळ सुविधेचा अभाव असल्याने पदपथावर अस्ताव्यस्त दुचाकी लावल्या जात आहेत.

पदपथांवरच अस्ताव्यस्त दुचाकी;  कर्वे रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या कायम

पुणे : मेट्रो प्रवाशांसाठी वाहनतळ सुविधेचा अभाव असल्याने पदपथावर अस्ताव्यस्त दुचाकी लावल्या जात आहेत. त्यामुळे मेट्रो सुरू झाल्यानंतरही नागरिकांना कर्वे रस्त्यावर वाहतूक कोंडीच्या अनुभवाला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी सुरू झालेल्या मेट्रोच्या प्रवासासाठी दुचाकींमुळे या कोंडीमध्ये अधिक भर पडत असल्याचे चित्र आहे.

पदपथावर वेडय़ावाकडय़ा पद्धतीने लावलेल्या दुचाकी हे चित्र कर्वे रस्त्यावरील रेल्वे आरक्षण कार्यालय ते वैद्यराज मामा गोखले चौक (आयुर्वेद रसशाळा) या परिसरात रस्त्याच्या डाव्या बाजूला दिसते. मेट्रो प्रवासाचा आनंद लुटण्यासाठी आलेले पुणेकर येथेच आपल्या दुचाकी लावून गरवारे महाविद्यालय स्थानक येथे जातात असा अनुभव आहे. त्यामुळे दुचाकींच्या गराडय़ातून पायी जाणाऱ्या पुणेकरांना पदपथाचा वापर करणे मुश्कील झाले आहे. इतकेच नव्हे तर अनेकदा चारचाकी वाहने देखील रस्ता अडवतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच पदपथावर लावलेल्या दुचाकी आणि रस्त्यावरील चारचाकी वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी हा नवा पैलू समोर आला आहे. सध्या गरवारे महाविद्यालय ते वनाज एवढय़ाच मार्गावर मेट्रो धावत आहे. त्यामुळे गरवारे महाविद्यालय स्थानक गाठण्यासाठी रस्त्यावर दुचाकी लावली जाते. अनेकजण परतीच्या प्रवासाचे तिकिट काढत असल्याने दुचाकी घेण्यासाठी पुन्हा गरवारे महाविद्यालय स्थानकावर यावे लागते. त्यामुळे या परिसरात दुचाकींनी पदपथ व्यापला असल्याचे चित्र दिसते.

सध्या गरवारे महाविद्यालय ते वनाज एवढय़ाच मार्गावर

मेट्रो धावत आहे. तर, ही परिस्थिती आहे. वनाज ते रामवाडी अशी पूर्ण क्षमतेने मेट्रो धावू लागल्यानंतर वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न गंभीर होऊ शकेल, हा मुद्दा या निमित्ताने उपस्थित झाला आहे. वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्याच्या उद्देशातून मेट्रो प्रकल्पाची कार्यवाही करण्यात आली असली तरी मेट्रो प्रवासासाठी वेडय़ावाकडय़ा पद्धतीने लावलेल्या दुचाकी वाहनांमुळे कर्वे रस्त्यावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

मेट्रो प्रवासासाठी महिलांची गर्दी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मंगळवारी महिलांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावून मेट्रो प्रवासाचा आनंद लुटला. शाळकरी मुली, महाविद्यालयीन विद्यार्थीनी, युवती, नोकरदार महिला, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध वयोगटातील महिलांनी गरवारे महाविद्यालय स्थानकावर येऊन मेट्रो सफर अनुभवली. दुपारच्या सत्रामध्ये मेट्रोतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलांनी चक्क फुगडी खेळत सामूहिकपणे गाणी गाण्याचा आनंद लुटला. याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने पुणेकर मेट्रोचा वापर कसा करू शकतील, याचा नेम नाही, अशी चर्चा रंगली.

वाहनतळासंदर्भात महापालिकेबरोबर चर्चा सुरू आहे. गरवारे महाविद्यालयालगत वाहनतळासाठी आरक्षित असलेली जागा महापालिकेकडून ताब्यात घेण्यात येईल. पदपथांवर लावल्या जात असलेल्या दुचाकींसाठी परिसरात वाहनतळ करण्यासंदर्भात पाठपुरावा सुरू झाला आहे.

-अतुल गाडगीळ,  प्रकल्प संचालक, महामेट्रो

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Lack parking facilities metro passengers bikes sidewalks problem conundrum persists ysh

ताज्या बातम्या