लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहरातील जलदगती (बस रॅपिड ट्रान्झिट- बीआरटी) मार्ग मृत्यूशय्येवर असताना आता नव्याने एका बीआरटी मार्गाचा घाट महापालिकेने घातला आहे. वाकडेवाडी ते बोपोडी या मार्गावर येत्या काही दिवसांत बीआरटी सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी ८५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. बीआरटी मार्गासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, शहरातील बीआरटी मार्ग केवळ कागदावरच असताना सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी कशाला, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होण्यास सुरुवात झाली आहे.

सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी पंधरा वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करत बीआरटी मार्ग सुरू करण्यात आला. बीआरटी सेवा सुरू करणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली होती. त्यानंतर देशातील अनेक प्रमुख शहरात बीआरटी सेवेचा झपाट्याने विस्तार होत असताना आणि देशभरात एक हजार किलोमीटरहून अधिक लांबीचे जाळे निर्माण झाले असताना शहरातील बीआरटी कागदावरच राहिली आहे. महापालिकेच्या दरवर्षीच्या अंदाजपत्रकात बीआरटी मार्गाचे सक्षमीकरण करण्यासाठी नव्याने बीआरटी मार्ग प्रस्तावित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. त्यानंतरही बीआरटी मार्गांचे सक्षमीकरण झालेले नसल्याची वस्तुस्थिती आहे. तरीही कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

आणखी वाचा-पीएमपीच्या ताफ्यात १०० गाड्या, संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या हद्दीत या वर्षी ‘बीआरटी’चे नवीन तीन मार्ग तयार केले जाणार आहेत. त्यात दिघी ते आळंदी, मुकाई चौक ते भक्ती शक्ती (पिंपरी-चिंचवड) आणि बोपोडी ते वाकडेवाडी (पुणे) या मार्गांचा समावेश आहे. तिन्ही मार्गांची लांबी १७.५ किलोमीटर आहे. यातील वाकडेवाडी ते बोपोडी या मार्गासाठीच्या भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. हा रस्ता २१ फुटांचा असून, तो ४२ फूट रूंद करण्यात येणार आहे.

बीआरटी मार्ग काढण्याची नामुष्की

नगर रस्त्यावरील येरवडा (गुंजन चौक) ते विमाननगर फिनिक्स मॉलपर्यंतचा बीआरटी मार्ग काढण्याची नामुष्की महापालिका आणि पीएमपी प्रशासनावर आली होती. मेट्रोच्या कामामुळे हा बीआरटी मार्ग गेले कित्येक महिने बंद होता. त्यातच बीआरटी मार्गामुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी झाल्याने बीआरटी मार्ग काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आणखी वाचा-मुदतवाढीच्या मुद्द्यावर ‘मसाप’च्या वार्षिक सभेत वादावादी, हमरीतुमरी

केवळ सातारा रस्त्यावरच बीआरटी मार्ग

शहरातील सातारा रस्त्यावरील बीआरटी मार्ग कसाबसा सुरू आहे. सोलापूर आणि नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग बंद असून त्यांची दुरवस्था झाली आहे. या भागात काही अंतरातच बीआरटी मार्ग सुरू आहे. एकसंधपणे १० किलोमीटर लांबीच्या अंतरात बीआरटी सेवा देता आलेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग सुरू असल्याचा महापालिका आणि पीएमपी प्रशानसाचा दावा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाकडेवाडी ते बोपोडी बीआरटीसाठी भूसंपादन झाले आहे. रस्ता मोठा झाल्याने येत्या वर्षभरात बीआरटी सेवा सुरू करण्याचे नियोजित आहे. -व्ही. जी. कुलकर्णी, मुख्य अभियंता, पथ विभाग, पुणे महापालिका