लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : नववर्षाच्या मध्यरात्री खेड शिवापूर टोलनाक्याजवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली. या कारवाईत राज्यात विक्रीसाठी बंदी असलेल्या गोव्यातील एक कोटी रुपयांचे मद्य जप्त करण्यात आली.

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गोव्यातील मद्य मोठ्या प्रमाणावर पुणे शहर परिसरात विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाला मिळाली होती. ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर मद्य विक्रीस पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाक्याजवळ पथकाने संशयित ट्रकची तपासणी केली. तेव्हा ट्रकमध्ये मद्याच्या बाटल्या सापडल्या. तपासणीत मद्याची निर्मिती गोव्यात करण्यात आल्याची माहिती मिळाली. पथकाने ट्रकमधील एक हजार मद्याची खोकी जप्त केली. या कारवाईत ट्रक, तसेच मद्याच्या बाटल्या असा एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ट्रकचालकासह साथीदाराला अटक करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-हडपसरमधील कालव्यात दोन मृतदेह सापडले

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण, पुणे विभागाचे आयुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक चरणसिंह रजपूत, उपअधीक्षक संजय पाटील, युवराज शिंदे, एस. बी. जगदाळे आणि पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणाचा तपास सासवड येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून करण्यात येत आहे.