लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी सोमवारी चार अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तसेच १५ उमेदवारांनी अर्ज घेतले. त्यामध्ये बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, अजित पवार, महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सचिन दोडके यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

बारामती मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १२ मार्चपासून सुरूवात झाली. शनिवार, रविवार सुटी असल्याने सोमवारी महेश बाबर, शुभांगी धायगुडे, संदीप देवकाते आणि सचिन आगवणे या चार अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले. १५ उमेदवारांनी अर्ज घेतले. आतापर्यंत या मतदारसंघात एकूण चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, तर ५५ उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत. अर्ज भरण्याची मुदत १९ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे.

आणखी वाचा-अजित पवारांनी दिली जाहीर कबुली; म्हणाले, ‘औद्योगिक पट्ट्यात गुंडगिरी…’

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या नावे अर्ज घेतले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे आणि सचिन दोडके यांनी अर्ज घेतले आहेत. याशिवाय बहुजन समाज पार्टी, देश जनहित पार्टी, अखिल भारतीय जनता दल, रिपाइं आदी राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत, असे बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.