पुणे : बेताल गद्य वर्तमानाला लयीत आणणारी पद्य सांजवेळ सावल्यांच्या पावलांनी चांदण्यांत नेते. या घटिताच्या विधानाखाली स्वाक्षरी असते, बाकीबाब! कवितेला अजूनही रसिकतेचा ‘कान’ असल्याची ही द्वाही फिरवतो ‘लोकसत्ता’तर्फे आयोजित बा. भ. बोरकरांच्या कवितांच्या सादरीकरणाचा कार्यक्रम, जे असतं निजगुज गुंफित केलेलं ‘पोएट बोरकरां’चं समूहस्मरण!
‘लोकसत्ता’च्या वतीने प्रकाशित ‘बाकीबाब’ या बा. भ. बोरकर स्मृती विशेषांकाचे प्रकाशन टिळक स्मारक मंदिरातील तुडुंब गर्दीने भरलेल्या काव्यप्रेमी रसिकांच्या साक्षीने बुधवारी झाले. या निमित्ताने ‘बाकीबाब’ या बोरकर यांच्या कवितांवर आधारित कार्यक्रमा मराठी कवितांच्या कार्यक्रमाला मिळालेला हा उदंड प्रतिसाद कवितेप्रती असलेल्या मराठी माणसाच्या जिव्हाळ्याची साक्षच.
डाॅ. अरुणा ढेरे, नीरजा, सौमित्र (अभिनेते किशोर कदम), दासू वैद्य, संगीतकार-गायक मिलिंद जोशी, युवा लेखक प्रणव सखदेव, अभिनेत्री मधुरा वेलणकर, लीना भागवत, पर्ण पेठे, अभिनेता जितेंद्र जोशी आणि गायक चंद्रकांत काळे यांनी आपल्या प्रतिभेचे रंग भरत बोरकरांची कविता या कार्यक्रमात हळुवारपणे उलगडली. या सर्व कलाकारांसह पुनीत बालन ग्रुपचे अजिंक्य घाटे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेडचे किरण ठाकूर, वीणा वर्ल्डचे ओंकार शिंदे आणि एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचे प्रसाद वर्पे यांच्या हस्ते ‘बाकीबाब’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रायोजकांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
‘गडद निळे गडद निळे जलद भरूनी आले’ या काव्य सादरीकरणाच्या चित्रफितीने कार्यक्रमाची नांदी झाली. तर, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाई यांनी सादर केलेल्या बोरकरांच्या कवितांच्या मैफलीच्या चित्रफितीने कळसाध्याय गाठला गेला. यातील ‘मधल्या ओळी’ भरल्या आणि भारल्या, त्या कलाकारांच्या उत्कट सादरीकरणाने.
बोरकर यांचा सहवास आणि त्यांच्याकडून कविता ऐकण्याचे भाग्य लाभलेल्या अरुणा ढेरे आणि नीरजा यांनी बोरकरांच्या आठवणी सांगितल्या. ‘कविता ही चांदण्या रात्री नदीकाठी बसून ऐकायची असते,’ असे म्हणणारे बोरकर यांच्या कविता मुठेकाठी बसून ऐकण्याची संधी लाभलेली मी भाग्यवान आहे,’ असे ढेरे यांनी सांगितले, तर, ‘बोरकर एकटे रात्रभर कविता म्हणतायेत, हा अनुभव मी आमच्या घरी घेतला आहे,’ असे नीरजा यांनी नमूद केले. ‘यमक छंदात गंमत असते हे बोरकरांच्या कवितेने पहिल्यांदा जाणवले,’ असे सौमित्र म्हणाले. आवाज नसला, तरी गुणगुणावे असे वाटणे हेच बोरकरांच्या कवितेचे बलस्थान असल्याची भावना वैद्य यांनी व्यक्त केली.
‘समुद्र बिलोरी ऐना…’, ‘प्रार्थना…’, ‘दिवस जरेचे आले…’, ‘ज्ञानदेव गेले तेव्हा…’, ‘माझ्या गोव्याच्या भूमीत…’, ‘झाले हवेचेच दही…’ अशा एकाहून एक सरस कविता रंगमंचावरून सादर होत असताना रसिकही त्यामध्ये आपला सूर मिसळून काव्याचा आनंद लुटत होते.
‘स्वर्ग नको सुरलोक नको’, ‘इंद्रदिनीचा असर सरेना’, ‘देखणे ते चेहरे’, ‘घन वरसे रे’, ‘रतन अबोलीची वेणी माळलेली तू’, ‘काळ बोले टक टक’, ‘तू गेल्यावर फिके चांदणे’, ‘तव नयनांचे दल हलले गं’, ‘डाळिंबीच्या डहाळीशी नको वाऱ्यासारखे झुलू’ आणि ‘किती किती राहशील सावध’ अशा कवितांच्या सादरीकरणाने ही कवितेची सांजवेळ उत्तरोत्तर रंगत गेली.
‘कवितांच्या कार्यक्रमाला इतकी छान गर्दी होते हे आश्वासक वाटावे, असे चित्र आहे,’ असे नमूद करून ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी प्रास्ताविकामध्ये या विशेषांकाच्या प्रकाशनामागची भूमिका मांडली. विशेषांकाचे संयोजन मुकुंद संगोराम यांनी केले आहे, तर कार्यक्रमाचे संहितालेखन आणि निवेदन होते कुणाल रेगे यांचे.
- मुख्य प्रायोजक : पुनीत बालन ग्रुप
- सहप्रस्तुती : राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग
- सहप्रायोजक : वीणा वर्ल्ड, डिपार्टमेंट ऑफ इन्फर्मेशन अँड पब्लिसिटी, गव्हर्न्मेंट ऑफ गोवा, सुहाना अंबारी मसाले, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी लिमिटेड आणि एम. के. घारे ज्वेलर्स
- पॉवर्ड बाय : एनकेजीएसबी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था आणि एम पी ग्रुप