लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर लोणावळ्या जवळील देवले आणि औंढे पुलादरम्यान खासगी प्रवासी बसची पुढे जात असलेल्या टेम्पोला जोराची धडक बसून झालेल्या अपघातात बसमधील २३ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी अकरा प्रवासी गंभीर जखमी झाले असून, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. बसमध्ये एकूण ३६ प्रवासी होते. हा अपघात गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.

आशिया अयाज तांबोळी (वय ४५, रा. सांगली), फुलाबाई श्रीकांत काळे (वय ६५, रा. मुंबई), बसचालक दिनकर डोंगरे (वय ५०), सहायक चालक विशाल माने (वय २५), संजय श्रीकांत काळे (वय ४०), संजय शिवाजी भोसले (वय ५०), मंगल सुरेश सुतार (वय ६०), अमोल रामचंद्र पाटील (वय ३१), प्रिया सुशांत सुतार (वय ३४), वैभव रघुनाथ जाधव (वय ३५), शुभम हेमंत चिमगावकर (वय २०), दीपक प्रकाश गायकवाड (वय ४८), किरण बाळासाहेब काळे (वय ४९), सईबाई जयराम शेळके (वय ३६), कुमार राजमोहम्मद शेख (वय २५), पृथ्वी संजय देवकाते (वय २५), प्रणित गणेश मोरे (वय २५, सर्व रा. कोल्हापूर), संतोष जगन्नाथ राऊत (वय ४९, रा. धनकवडी, पुणे), जिग्नेश रमेश शहा (वय ४९, रा. गुजरात), नविना अतुल पाटोळे (वय २३), अतुल बबन पाटोळे (वय ३०, दोघेही रा. नेरूळ), सुनीता सुभाष पोळ (वय ५५, रा. भांडूप, मुंबई), स्वप्नील हरिंद्रसिंह सोदी (वय ३४, रा.ठाणे) अशी अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा – पुणे : हरवेलेले मांजर शोधून देण्याचा बहाणा करून महिलेशी असभ्य वर्तन

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून बोरिवलीला प्रवासी घेऊन जाणाऱ्या खासगी बसच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस पुढे जात असलेल्या टेम्पोला जोरात धडकून हा अपघात झाला. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले असून बसमधील २३ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी अकरा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर, तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

हेही वाचा – पिंपरी : लग्नाच्या आमिषाने डॉक्टर मित्राने केलेल्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघाताची माहिती मिळताच खंडाळा महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक विजय शेटे, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत आवारे, पोलीस हवालदार विजय गाले, सीताराम बोकड आणि दोन्ही पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांसह देवदूत आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेची पाहाणी करत पोलिसांनी देवदूत आपत्कालीन पथकाच्या मदतीने बसमधील सर्व जखमींना तत्काळ उपचारासाठी सोमाटणे येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तर, किरकोळ जखमींना घटनास्थळी उपचार करण्यात आले. त्यानंतर अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहेत.