Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : विधानसभा निवडणुकीचे आज निकाल जाहीर झाले. राज्यभरात गाजलेल्या मतदारसंघापैकी एक असलेल्या पुण्यातील कोथरूड मतदार संघात भाजापाचे प्रदेशाध्यक्ष व महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा अटीतटीच्या लढतीत विजय झाला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांच्यावर बाहेरचा उमेदवार नको अशी सातत्याने टीका करण्यात आली होती. मात्र सुमारे २५ हजारांचे मताधिक्य घेत ते विजयी झाले. चंद्रकांत पाटील यांना तब्बल १ लाख ४ हजार मतं मिळाली तर मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना ७९ हजार मतं मिळाली. विशेष म्हणजे किशोर शिंदे यांना राष्ट्रवादीकडून पाठींबा देण्यात आला होता, त्यामुळे ही लढत अधिकच चुरशीची होणार असे बोलले जात होते. अखेर या लढतीत चंद्रकांत पाटील यांनी बाजी मारल्यानंतर त्यांनी कोथरूडकरांनी मला स्वीकरल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो असे म्हटले आहे.
चंद्रकांत पाटील हे विजयी होताच त्यांनी कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी खासदार गिरीश बापट यांची उपस्थिती होती. भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून त्यांचे जोरदार स्वागत केले.
विजयी झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, कोथरूडच्या जनतेने मला विधानसभेवर निवडून पाठवलं, सुरूवातीला मी बाहेरचा आहे, बाहेरचा आहे असं जरी बोलल्या गेलं तरी कोथरूडकरांनी मला स्वीकरलं त्याबद्दल कोथरूडमधील नागरिकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. भाजपासह महायुतीमधील सर्वच पक्षांकडून अतिशय मनापासून माझ्यासाठी काम केलं. याचबरोबर अनेकांनी निरपेक्ष भावनेने काम केलं आहे, त्यांचे देखील मी आभार मानतो. राज्यात आम्हाला फार मोठा फटका बसला असं म्हणता येणार नाही, कारण जेव्हा आम्ही २६० जागा लढवल्या तेव्हा आम्ही १४० जागा जिंकलो होतो. आता आम्ही १५० लढवल्या व १४ घटकपक्षांनी लढवल्या आहेत, त्यात आम्ही १०५ जिंकलो आहोत. हा जो जिंकण्याचा रेषो आहे तो मागीलवेळी ४७ टक्के होता, ७७ टक्के आहे. मतांमध्ये देखील फार घट झालेली नाही. अनेक ठिकाणी झालेल्या बंडखोऱ्या शमवत्या आल्या नाहीत, याचा काहीप्रमाणात फटका बसला. पण भाजपा-शिवसेना महायुतीचं सरकार राज्यात नक्की येणार आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्ते केला.
तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकारपरिषद महाराष्ट्रातील सर्व जनेतेने पाहिली. यामध्ये कुणाच्या डोक्यात वेगळा विचार करण्याचा विषयच नाही. एकूण जे २२ अपक्ष आमदार आले आहेत, त्यातल्या १५ जणांनी निवडून आल्या आल्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधलेला आहे व ते देखील बरोबर येत आहेत. भाजापाचे आतापर्यंत निवडून आलेले १०५ आमदार असले तरी ही संख्या १०९ पर्यंत जाईल असे वाटतं. कारण खूप ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी मोजणी थांबलेली आहे. मजबूत सरकार येईल व महाराष्ट्रातील जनतेचा अपेक्षा पूर्ण होतील, असेही ते म्हणाले.
जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. पाच मंत्री पराभूत झाले आहेत, याचं विश्लेशन आम्ही करू, मात्र महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी सरकार पहिल्यांदाच येत आहे. आतापर्यंत आलेलं नाही. त्यामुळे दुसऱ्यांदा हे सरकार येत आहे, याकडे आपण कौतुकाने पाहायला हवे. साताऱ्याचा व पंकजाताईंचा पराभव आमच्या सगळ्यांच्याच मनाला लागलेला आहे, असे देखील चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.