राष्ट्रीयता आणि सामाजिक सद्भभावनेचा स्त्रोत म्हणून लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली तेव्हा दग़डूशेठ हलवाई त्यांच्यासमवेत होते. हा गणेशोत्सवच महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या जनआंदोलनाचे माध्यम झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच भूमीमध्ये सामाजिक आंदोलन सुरू करून मानवतेसाठी आदर्श निर्माण केला. महाराष्ट्राला ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे देशातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्राने मोठे योगदान दिले असून भविष्यातही महाराष्ट्र अग्रेसर असेल, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी काढले.
कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वषार्चा शुभारंभ कार्यक्रम राष्ट्रपतींच्या उपस्थितीत झाला. त्याप्रसंगी कोेविंद बोलत होते. कोविंद यांच्या पत्नी सविता कोविंद, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष अॅीड. प्रताप परदेशी आणि कार्यकारी विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागिरदार या वेळी उपस्थित होते.
कोविंद म्हणाले, राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळात मी १२-१३ वेळा महाराष्ट्रात आलो आहे. सामाजिक कार्यात महाराष्ट्र नेहमी अग्रणी राज्य राहिले आहे. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव महाराज, समर्थ रामदास यांनी समाजाला नवी दिशा दिली. त्यामुळे भारतामध्ये नवीन चेतना जागृत झाली. दगडूशेठ दाम्पंत्याने पुण्यात गणपती उत्सव आणि लक्ष्मीबाई दगडूशेठ यांनी दत्त मंदिराच्या माध्यमातून नवीन ऊर्जा दिली आहे.
रामनाथ कोविंद म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा सरदारांनी भारताची एकजूट करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली. सावित्रीबाई फुले यांनी मुलींची पहिली शाळा पुण्यात सुरू केली. आनंदी गोपाळ जोशी या देखील देशातील पहिल्या डॉक्टर महाराष्ट्रातीलच होत्या. प्रतिभा पाटील यांच्या रूपाने पहिल्या महिला राष्ट्रपतीचा बहुमान महाराष्ट्राच्या भूमीला प्राप्त झाला.
प्रतिभा पाटील म्हणाल्या, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या सव्वाशेव्या वर्षाचा शुभारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थित व्हावा, ही दत्तभक्त आणि विश्वस्तांची इच्छा पूर्ण झाली. दगडूशेठ हलवाई आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई हे श्रद्धाळू दाम्पत्य होते. दत्तमंदिर ट्रस्ट आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून अविरतपणे सामाजिक कार्य सुरू आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश अशा त्रिगुणात्ममक दत्तमहाराजाच्या उत्सवाला देशाच्या तिन्ही दलांचे प्रमुख असलेले राष्ट्रपती यावेत हा योग यानिमित्ताने साधला गेला आहे.
कोविंद यांच्या हस्ते महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ.माधुरी कानिटकर, आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ञ डॉ. प्राजक्ता काळे आणि राईज अँड शाईन बायोटेक प्रा. लि. च्या अध्यक्षा व पिंपरी येथील डॉ. डी. वाय.पाटील अभिमत विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु डॉ.भाग्यश्री पाटील यांना लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री दत्तमंदिराच्या सव्वाशे वर्षाच्या कायार्चा आढावा घेणाऱ्या ‘लक्ष्मीदत्त’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन प्रतिभा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
ॲड.प्रताप परदेशी यांनी प्रास्ताविक केले. ॲड. शिवराज कदम जहागिरदार यांनी आभार मानले. राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले.
उंच खुर्चीवर बसणे कठीण आहे. त्या पदाची जबाबदारी पार पाडणे कठीण असते. या पदावर काम करताना देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून मी खूप काही शिकलो.- रामनाथ कोविंद, राष्ट्रपती